ठाणे - आठवड्याभरापूर्वी बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह राहत असलेल्या घराच्या परिसरातील एका कंपनीच्या लगत असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. २ येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घडली. यश महेंद्र भुजंग(८) असे मुलाचे नाव आहे.
मृत यश हा उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. २ येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील जैतवन बुध्दविहार जवळ आपल्या आईसोबत राहत होता. तो इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. यश हा २१ डिसेंबरला सायंकाळी ४च्या सुमारास घराबाहेरीत अंगणात खेळत असताना तो अचानक गायब झाला. गेल्या आठवड्याभरापासून त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. याप्रकरणी, त्याच्या घरच्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर तब्बल ८ दिवसानंतर रविवारी सायंकाळी त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या परिसरातील कुकर कंपनीलगत असलेल्या पडीक जागेवरील पाण्याच्या टाकीत मिळून आला.
हेही वाचा - पाकिस्तानातून परतलेल्या गीता कुटुंबाच्या शोधात सोमवारी परभणीत
त्या ठिकाणावरील पाण्याच्या टाकीचा वापर केला जात नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ती पाण्याची टाकी त्याठिकाणी आहे. यशचा मृतदेह त्याठिकाणी सापडल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी, सडलेला मृतदेह बाहेर काढला. यानंतर शवविच्छेदनासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले.
पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू की हत्या?
यशचा त्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला हत्या करुन त्याठिकाणी मतदेह फेकला? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्कत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. यश याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.