ठाणे - बालभिकारी जाणीव जागृती अभियान मोहिमेला घेऊन भारत बालभिकारी मुक्त करण्यासाठी 24 ते 26 डिसेंबर या 3 दिवशी चिरंजीवी संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी उपोषण केले होते. त्यानंतर 2020 च्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या विभागात, राज्यात आणि भारतभर त्या 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. 6 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी कल्याण बापगाव येथील मैत्रकूल जीवन विकास केंद्र येथे हे उपोषण पार पडले, असे संघटनेचे राज्य सचीव चेतन कांबळे यांनी सांगितले.
हेही वाचा- 'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!
तसेच येथे प्रधानमंत्र्यांना पत्र पाठविण्याची सुद्धा मोहीम राबवली जात आहे. उपोषणाला भेट देण्यासाठी आलेली प्रत्येक व्यक्ती याला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती संघटनेच्या सहराज्यसंघटक श्रुती मयेकर यांनी दिली. तसेच संघटना, संस्थांनी येऊन सोमवारच्या उपोषणास आपला पाठिंबा दर्शवला आहे. हिंदू विकास संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन वर्तक यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले. हे उपोषण इथेच थांबणार नसून बालभिकारी मुक्त भारत होईपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे.
यापुढेही प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या भागात हे उपोषण असेल आणि सामान्यांनीही बालाभिकाऱ्यांना दया न दाखवता, त्यांना पैसे न देता त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी मदत करूया आणि सामान्यांनाही या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी केले. यापुढच्या 20 जानेवारीच्या सोमवारचे उपोषण हे कल्याण पूर्व भागात असणार आहे. तरी आपण पुढे सहभागी व्हावे, असे आवाहन सलोनी यांनी केले आहे.