ठाणे : घरातील छोट्या मोठ्या भांडणाचा राग आई आपल्या लहान चिमुकल्यांवर काढत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. यामुळे, संघर्षाचे चटके सहन करत स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना जगवणारी आई, हे आता फक्त बोलण्यापुरतेच राहिले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे पोलिसांच्या डायघर पोलीस ठाणे हद्दीत असा प्रकार घडला आहे. फिरदोस असे या क्रूर महिलेचे नाव आहे.
डायघर परिसरात दहिसर मोरी मधील ठाकूर पाडा येथे आपल्या दोन चिमुकल्यांसह राहणाऱ्या फिरदोस नावाच्या एका महिलेच्या घराचा दरवाजा बंद होता. मात्र, आतून सारखा जोर जोरात मुलांच्या रडण्याचा आवाज येत होता. एका मुलाचे वय २ वर्षे आणि दुसऱ्या मुलाचे वय ४ वर्षे आहे. मुलांच्या रडण्याचा आवाज का येतो म्हणून शेजाऱ्यांनी चौकशी केली असता, फिरदोस गेली २ दिवस आपल्या लहान मुलांना गरम चाकूचे चटके देत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. शेजाऱ्यांनी तत्काळ मध्यस्थी करुन दोन मुलांची सुटका केली आणि पोलिसांना बोलावून घेतले.
पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही लहान मुलांच्या हाता पायावर आणि पाठीवर गरम चाकूने दिलेले चटके दिसले. पोटच्या दोन्ही मुलांना अशा क्रुरतेने चटके दिल्याचे पाहून डायघर पोलिसांनी त्या क्रूर आईला सक्त ताकीद दिली. मात्र, कोणताही गुन्हा दाखल केला नाही. धक्कादायक म्हणजे फिरदोसच्या शेजारच्यांनी मुलांच्या जखमांवर मलम लावले आणि या तिच्या या कृत्याचा याचा जाब विचारला. मात्र, तिच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसला नाही. उलट सर्व बोलत होते म्हणून ती रागाच्या भरात मुलांना घेऊन मुंब्रा येथे निघुन गेली. पोलीस आता या महिलेचा शोध घेत आहेत. तसेच, या महिलेवर काय कारवाई करता येईल किंवा पुन्हा या मुलांसोबत असा प्रकार घडू नये याकरता काय करता येईल याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहेत.