ठाणे : राज्यात २०१९ मध्ये युतीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडणूका तुम्ही लढवल्या. मात्र तुम्ही परतफेड कशी केलीत हे राज्यातील जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळे तुम्हीच खरे कलंक आहात अशी खरमरीत टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. काही दिवसापूर्वी कलंक शब्द वापरून ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दौऱ्यास सुरूवात केली आहे. या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात ठाण्यातून आज झाली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, शीतल म्हात्रे, मनीषा कायदे, नरेश मस्के असे नेते आणि मंत्री उपस्थित होते.
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघे म्हणायचे ठाणे माझे आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे ठाणे दिघेंचे राहणार आहे. ठाण्याला शिवसेनेने भरभरून दिले आहे. दिघे यांनी हा जिल्हा पिंजून काढला आहे. त्यावेळी आम्हाला चिंता नव्हती दिघेंच्या आदेशाचे पालन आम्ही करायचो. शिवसेना आणि ठाणे असे एक वेगळे नात निर्माण झाले. ते नाते एकमेकांपासून आज कुणीही दूर करू शकत नाही. दिघे यांनी आम्हाला शिकवण असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
चिंता करू नका ; २०० पेक्षा जास्त आमदांचे पाठबळ - आम्ही चांगले आणि गतिमान काम करत असल्याने राष्ट्रवादीचे अजित पवार युतीमध्ये आले आहेत. झालेली युती भावनिक, तात्विक आणि वैचारिक आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. माझ्या मागे २०० पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे खोके घेणाऱ्यांनी खोक्याची भाषा करू नये. अशी टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली.