ठाणे : आज ठाण्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीयांकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी विकास कामांसाठी लागणारा निधी कुठेही कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगून गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात खूप विकास झाला असल्याचेही ते म्हणाले. डबल इंजिन सरकारचा फायदा महाराष्ट्राला होत आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका : डबल इंजिन सरकारचा महाराष्ट्राला फायदा होतो. पंतप्रधान सगळा निधी देतात, त्यासाठी मागायला लागते कडकसिंग बनून चालत नाही. घरी येऊन तुम्हाला कोणी पैसे देणार नाही. अडीच वर्षे आमची फुकट गेली. कारशेड गेले, आरे गेले, मेट्रो थांबली. आम्ही येऊन सगळ्या अडचणी दूर केल्या, अडथळे हटवले. आम्ही गेले वर्षभर काम करतो. आम्ही काहीच बोलत नाही. पण, तिथून मात्र दररोज आरोप प्रत्यारोप सरु आहेत. त्यांची चौकशी लागली, मग मोर्चाची आठवण झाली. तुम्हीच तर होते ना इतके वर्ष, मग मोर्चा कोणविरुद्ध काढता अशी, टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
कोणता हिशोब मागता : मागील 15 ते 20 वर्षे तुम्हीच सत्तेत होतात. मात्र, मुंबई खड्डेमुक्त करण्याचे काम आम्ही करतो आहे. पुढील अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार. आम्ही त्यासाठी खर्च करतो. कसला हिशोब मागणार, दूध का दूध पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. मेलेल्या माणसाच्या डेड बॉडीची पिशवी मागील सरकारने 6 हजारांमध्ये विकली. यांची माहिती मिळायलाच पाहिजे. आता ऑडिटची भाषा लागले, जे सत्य आहे ते सत्य आहे असे देखील शिंदे म्हणाले.
अधिकाऱ्यांवर कारवाई : अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून यंत्रणा कार्यक्षम करायला हवी. बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पाणी तुंबले तर कारवाईला तयार राहण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पावसाळ्यात सर्व अधिकारी वर्गाने फिल्डवर उतरून यंत्रणा नीट काम करते नाही का ते बघायला हवे. अधिकारी वर्गाने जबाबदारी घेऊन पावसाळ्यात कुठे पाणी तुंबले आहे का? ट्राफिक जॅम होतय का हे पाहायला हवे. आज सकाळी मी वर्षावरून येतांना जिथे जिथे पाणी साचले होत. तिथे बघून आलो, सर्व ट्राफिक सुरळीत सुरू आहे. कुठेही ट्राफिक थांबलेले नाही. त्यामुळे जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा सत्कार करू. बेजबाबदारपण वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करु अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
हेही वाचा - Panchkula Viral Video: नदीत कारसह वाहून जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचविले, अंगावर शहारे आणणारी घटना पहा