ठाणे - उच्चपदस्य अधिकारी शास्त्रज्ञ असल्याचा खोटे प्रोफाईल अकाऊंट मॅट्रीमोनियल साईटवर अपलोड करून महिलांना जाळ्यात ओढणाऱ्याला ( Cheating of Women from Matrimonial Site ) अटक करण्यात आली आहे. आरोपी आदर्श म्हात्रे असे त्याचे नाव आहे. ( Accused Adarsh Mhatre ) लग्नाचे आमिष दाखवून विविध कारणे सांगत बँकेच्या खात्यात पैसे टाकण्यास सांगत असे. तसेच पैसे घेऊन गायब झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यानंतर त्याला ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाच्या पथकाने अटक केली. ( Thane Crime Branch Property Division ) त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
14 लाखांचा गंडा -
हा प्रकार कल्याणमधील एका महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून समोर आला. या महिलेने विवाह जमण्यासाठी मॅट्रीमोनियल साइटवर आपल्या नावाची नोंदणी केली होती. या महिलेचे प्रोफाईल पाहून आरोपी आदर्श म्हात्रेने महिलेला आपल्या जाळ्यात ओढून आपण इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ असून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये विविध कारणे सांगून पैसे टाकण्यास भाग पाडले आणि तब्बल 14 लाख 60 हजार रुपयांच्या चुना लावला. त्यानंतरही आरोपी म्हात्रे हा पुन्हा 25 लाखाची मागणी करीत होता.
यामुळे या महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा मालमत्ता विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता आरोपी म्हात्रे हा वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याचे समोर आले. मात्र, पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत अभ्यास करून अशाच प्रकारे खोटी बतावणी करीत एका तरुणीला जाळ्या सोडून भेटण्यासाठी बोलावले असता त्याला अटक केली. त्याने आतापर्यंत अशाप्रकारे खोटी माहिती सांगून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर तब्बल १४ महिला आणि मुलींची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा - Wardha Minor Abortion Case : कदम रुग्णालयाच्या परिसरात पुन्हा खोदकाम सुरू; नवीन खुलासे होण्याची शक्यता
अनेक नावे आठ गुन्हे आधीच दाखल -
आरोपी आदर्श हा नव्हुश आणि तन्मय प्रशांत म्हात्रे या नावाचा वापर करत होता. त्याच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाणे, खडकपाडा पोलीस ठाणे, पार्कसाईट पोलीस ठाणे विक्रोळी मुंबई, सांगवी पोलीस ठाणे पिंपरी पुणे, अलिबाग पोलीस ठाणे, रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई, एपीएमसी पोलीस ठाणे नवी मुंबई या ठिकाणी अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली.
फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ -
महाराष्ट्रात फसवल्या गेलेल्या महिलांची व्याप्ती पाहता, अशा प्रकारच्या मॅट्रीमोनियल या वेबसाईट काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. खोट्या प्रलोभनाला बळी पडू नका आणि सावध राहा, असा असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.