ठाणे- मुस्लीम बांधवांचा 10 सप्टेंबर रोजी पवित्र मोहरम सण (ताजिया) असल्याने त्यानिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीच्या वेळी वाहतुक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी भिवंडी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा- आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी भर पावसात आदिवासी नागरिकांची निदर्शने
वाडा मार्गे भिवंडीच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक अंबाडी नाका येथून प्रवेश बंदी करून अंबाडी राजमार्ग क्रमांक आठ मार्ग बृहन्मुंबई महापालिका पाइपलाइन मार्ग रवाना होतील. तर पडघामार्गे येणारी वाहतूक चाविंद्रा जकात नाका येथे प्रवेश बंदी केली असून या मार्गे येणारी वाहतूक धामणगाव पाइपलाइन मार्ग इच्छित स्थळी जाऊ शकतील. ठाणे मार्गे भिवंडी शहरात येणारी वाहतूक नारपोली पोलीस ठाण्यापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एसटी बस व टीएमटी या बस नारपोली पोलीस ठाण्याजवळूनच माघारी वळतील. त्यासोबत भिवंडीत नवीन एसटी स्टँड कॉटरगेट जकात नाका पर्यंत रस्त्यावर वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी व वाहन चालकांनी या सूचनेचे पालन करून आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा- राज्याला मातीत घालण्याचा सरकारचा निश्चय, उद्योजकांच्या मागण्यांवरुन धनंजय मुंडे आक्रमक