ठाणे - एप्रिल महिना संपत आला तरी मधूर रसाळ हापूसची चव चाकरमान्यांना चाखण्यास अजूनही मिळालेली नाही. कोरोनाच्या दुष्टचक्रामध्ये कोकणचा हापूसही सापडला असून त्यामुळे हापूसचे उत्पादन घेणारा बागायतदारही भरडला जात आहे. लॉकडाऊनमुळे लाखो पेट्या कोकणात टाळेबंद झाल्या आहेत, तर तितकेच आंबे कलमावर पिकत आहेत. सरकारने आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळविक्री केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच हापूस चाकरमान्यांच्या भेटीला येतो. एप्रिल, मे हे दोन महिने म्हणजे हापूस चाखण्याचा हंगाम आहे. अवकाळी पावसाचा फटका सहन केल्यानंतरही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये मोठया प्रमाणत हापूस तयार झाला आहे. पण आता त्यावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढल्यामुळे आंब्याची विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. खरेतर कोकणातील हापूस आंब्याला मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, सांगली, कोल्हापूर बाजार समितीमध्ये मोठी मागणी असते. एकूण उत्पादनापैकी ४० टक्के आंबा या कृषी उत्पन्न बाजारसमितींमध्ये पाठवला जातो. त्यानंतर १५ टक्के हापूस निर्यात होतो, तर उर्वरित इतर शहरांमधील छोट्या-मोठया बाजारांमध्ये थेट मॉलमध्ये विक्रीसाठी जातो. मात्र, कोरोनाच्या संचारबंदीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असल्याने आज लाखो पेट्या कोकणातच पडून आहे. तितकेच आंबे कलमावर पिकत असल्याचे मोकल यांनी यांनी सांगितले.
आज २० एप्रिलपासून एपीएमसी सुरू होणार आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून फळे, भाजीपाला नियमन मुक्त झाल्यामुळे ८ ते १० टक्के आडत, दलाल, व्यापारी वर्गाला मिळेनासे झाले आहे. त्यामुळे दलालांना आंबाविक्रीत रस राहिलेला नाही. त्यामुळे सरकारनेच आता पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी मोकल यांनी निवेदनाद्वारे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिगचे सर्व नियम पाळून कोकणातील हापूस बागायतदार विक्री करण्यास तयार आहेत. त्यासाठी शासनाने सकाळी, सायंकाळी ठरावीक वेळ द्यावी, अशी मागणी पणन मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तसेच राज्य कृषी पणन मंडळालाही आवश्यक सूचना द्यावी, अशी विनंती चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत आंबा विक्रीसाठी यंत्रणा राबवून प्रयत्न करणार असल्याचे मोकल यांनी सांगितले.
देवगडच्या संतोष सावंत यांनी यंदा मोठया प्रमाणात हापूसचे उत्पादन केले आहे. पण, त्यांचा शेकडो पेटींचा आंबा पडून आहे. हिरवे आंबे पिकायला लागले असून ते कुजण्याची भीती या बागायतदाराने व्यक्त केली आहे. झाडावरून आंबे काढले, तर ते लवकर खराब होतील या भीतीने अनेक बागायतदारांनी आंबे झाडावरच ठेवले आहेत. कोकण येथील बागायतदार यांचे सुमारे ५०० पेट्या भरतील इतका आंबा झाडावरच लोेंबकळत असून हापूस पिकायलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे हापूस फेकून देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.