ठाणे : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बनावट आधारकार्ड ते शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंतचा १८ वर्षे वयाचा पुरावा दाखवून तिचा विवाह गुजरातमधील २५ वर्षीय तरुणासोबत केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये (Thane Crime) समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हिललाईन (Hill line Police Station)पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्या आई व मामावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीला शिक्षिका व्हायचे होते: पीडित मुलगी तिच्या आई व मामासह नेवाळी नाका भागात राहते. तिच्या आईला पूजा नावाच्या महिलेने पीडित मुलीसाठी गुजरातमध्ये विवाहासाठी मुलगा असल्याचे सांगितले. तेव्हापासून पूजा नावाच्या महिलेने मामाच्या मदतीने पीडित मुलीचे आधारकार्ड ते शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंतचा १८ वर्ष वयाचा पुरावा बनवला आणि तिचा विवाह गुजरातमधील तरुणाशी निश्चित केला. परंतु पीडित मुलीला पुढे शिकून शिक्षिका व्हायचे होते. मात्र तिच्या आईने ७ वी इयत्तेपर्यतच कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्यामुळे तिची शाळा बळजबरीने बंद केली. त्यातच विवाहासाठी पीडित मुलगी तयार नव्हती, तरी बळजबरीने मुलीची आई व मामा गुरुनाथ यांनी पीडित मुलीला गुजरातमध्ये नेऊन तिचा २५ जून २०२२ रोजी जयेश नाथानी नावाच्या २५ वर्षीय तरुणाशी विवाह लावुन दिला.
मुलीच्या वडिलांना गुजरातमध्ये लग्नाला विरोध: तपास अधिकारी महिला एपीआय अंबिका घस्ते यांनी सांगितले कि, आई आणि मामाने तिला लग्नासाठी जबरदस्ती केली होती. त्यांनी तिची सर्व कागदपत्रे बदलून २५ जून रोजी गुजरातमध्ये लग्न होईपर्यंत; त्यांनी तिला कधीही घराबाहेर बाहेर जाऊ दिले नाही. मात्र मुलीच्या वडिलांचा गुजरातमध्ये लग्नाला विरोध केला. म्हणून मुलीच्या आईने तिच्या वडिलांना लग्नात सहभागी होऊ दिले नाही.
सासरहुन असा काढला पीडितेने पळ: दुसरीकडे मुलगी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला विवाह झाल्यानंतरही संधी मिळत नाही. मात्र, ५ जुलै रोजी ती पुजेशी संबंधित काही कामासाठी सासरच्या नातेवाईकांसोबत घराबाहेर पडली. त्यावेळी तिच्याकडे घरी परतण्यासाठी तिकीट काढण्यास काही पैसे होते. हि संधी साधून तिने तेथून पळ काढला आणि उल्हासनगरला पोहोचले. पण तिला माहित होते की, ती घरी परतली तर तिला तिच्या आईचे ऐकावे लागेल. आणि तिला पुन्हा सासरी पाठवतील, या भीतीने तिने हिल लाईन पोलिस ठाणे गाठले.
पीडित बालगृहात असून तिला शाळेत जाण्यासाठी मदत करू: त्यानंतर तिच्यावर घडलेला प्रसंग सांगताच आई व मामासह, पूजा नावाच्या महिलेवर फसवेगिरीचा व बालविकास प्रतिबंधक अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'ती आता सरकारी बालगृहात असून आम्ही तिला शाळेत जाण्यासाठी मदत करू', असेही महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका घस्ते यांनी सांगितले.