मीरा भाईंदर(ठाणे)- मिरारोड येथील नयानगरमधील गंगा कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढण्याची कारवाई करत असताना, पालिका प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण...
मिरा भाईंदर पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी मिरा-भाईंदर शहराचे बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी, २१ डिसेंबरपासून शहरात सर्व अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बॅनर, होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात सगळीकडे कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ४ चे प्रभाग अधिकारी कर्माचाऱ्यासह नयानगर परिसरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटवत होते. यावेळी नयानगर मधील गंगा कॉम्प्लेक्स येथे अमनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अनधिकृत बॅनर काढत असताना, अब्दुल रहमान शेख आणि त्याचा साथीदार सलीम शेख यांनी घटनास्थळी येऊन बॅनर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांनी मध्यस्थी करून, वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
दोघांवर गुन्हा दाखल...
याप्रकरणी प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांनी नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भादवि कलम 353, 323, 506, 188, 269, 270, 34 त्याच प्रमाणे महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 चे कलम 11 सोबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(बी) व साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल रहमान मकबूल हुसेन शेख उर्फ रहमान कालिया आणि ट्रस्टचे सेक्रेटरी सलीम अजमुद्दीन शेख नावाच्या दोन व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.