ठाणे - कल्याण तालुक्यातील म्हराळ गावात रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बोगस डॉक्टरने कोरोनाच्या काळात दवाखाना थाटला होता. अनुप रामजी जोंधळे ( वय ३६ ) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
बोगस डॉक्टर निघाला एक्सरे टेक्निशियन
कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात लक्ष्मी छाया क्लिनिक नावाने अनुप जोंधळे याने दवाखाना थाटला होता. या ठिकाणी डॉक्टर असल्याचे भासवत तो रुग्णांवर उपचार करत होता. १२ वी नंतर एक्सरे टेक्निशियन कोर्स केलेल्या अनुपने बोगस प्रमाणपत्रांद्वारे डॉक्टरकीचा व्यवसाय सुरू केला. कोरोना काळात त्याचे वडील रामजी यांचे निधन झाल्याने बोगस कागदपत्रांच्या अधारे आपण डॉक्टर आहोत असे भासवत छाया क्लिनिकमध्ये त्याने रुग्णांवर उपचार सुरू केले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्याने केला पर्दाफाश
बोगस डॉक्टरची तक्रार कल्याण पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी भारत मासाळ यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तातडीने दखल घेत अनुप जोंधळे याची डॉक्टरकीची कागदपत्रे ताब्यात घेत मेडिकल काउन्सिलकडे पाठविली. ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मासाळ यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात जोंधळे विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी जोंधळेवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधि. १९६१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास एपीआय रंगराव पवार हे करीत आहेत.
हेही वाचा - Thane Crime : कोव्हिड सेंटरमधून पळालेल्या आरोपीला 7 महिन्यानंतर अटक