ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर सरवली गावच्या हद्दीत एका धावत्या इर्टिगा कारला अचानक आग लागली. या आगीत कारसह पाच लाखांची रोकडही काही क्षणातच जळून खाक झाली. या घटनेत डॉक्टर असलेले कार चालक थोडक्यात बचावले.
डॉ. सुंदरलाल प्रजापती असे कार मालकाचे नाव आहे. डॉ. प्रजापती त्यांच्याकडे असलेली ५ लाख रुपयांची रोकड भिवंडी-अंजुरफाटा येथील बँकेत जमा करण्यासाठी मंगळवारी दुपारी निघाले होते.मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली येथील रिलायंस पेट्रोल पंपासमोर असताना कारच्या इंजिनमधून अचानक धूर येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून ते गाडी बाहेर पडले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली.
हेही वाचा - ठाण्याच्या मनोरुग्णालयात 2 रुग्णांची गळफास लावून आत्महत्या; कर्मचाऱ्यांवर कारवाई
या आगीमध्ये डॉ. प्रजापती किरकोळ जखमी झाले आहेत. या आगीची माहिती रांजनोली बायपास नाका येथील वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळच असलेल्या पाईपलाईनमधून पाणी उपलब्ध करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत कार संपूर्ण जळून खाक झाली होती.