ठाणे- मुंब्रा भागात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे (MH ०४ DR ७७७५) क्रमांकाची होंडा कंपनीची गाडी जळून खाक झाली. यावेळी दुसरी गाडी वेळीच मुंब्रावासियांनी हटवल्याने ती आगीपासून थोडक्यात बचवली. ही घटना मध्यरात्री ३ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवीतहानी झाली नाही.
मुंब्र्यातील शाहीद महल रोडवरील अब्बा बिल्डिंगला लागून असलेली महावितरणचे केबल आणि डीपी उघड्यावर होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास अचानक या डीपीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आग इतकी भयंकर होती की छोटे-छोटे स्फोट होऊ लागले ज्यामुळे आगीच्या ठिणग्या उडून बाजूलाच उभ्या असलेल्या (MH ०४ DR ७७७५) या होंडा कंपनीच्या गाडीवर पडल्याने त्या गाडीने पेट घेतला. मुंब्रावासीयांनी आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. एकाने अग्नीरोधक गॅस देखील आगीवर सोडला, पण आग वाढतच गेली. संपुर्ण गाडीने पेट घेतल्याने त्या बाजूला उभी असलेली दुसरी गाडी सुद्धा पेटणार होती, पण आग लागण्याच्या अगोदरच नागरीकांनी त्या गाडीच्या काचा फोडून ती गाडी पुढे नेली. त्यामुळे ती गाडी आगी पासून वाचली. हा संपुर्ण थरार पहाटे ६ वाजेपर्यंत सुरुच होता.