नवी मुंबई - सायन महामार्गावर बुधवारी सकाळी साडेपाच वाजता एक खासगी बस भुयारी मार्गावर चढली. खारघर टोल नाका, कळंबोलीतील पुरुषार्थ पेट्रोल पंपासमोर ही दुर्घटना घडली. यामध्ये १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. कोल्हापूरवरून बदलापूर येथे ही बस (एमएच ०८ ई ९२८७) जात होती.
बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास बस पनवेल सायन महामार्गावर पुरुषार्थी पेट्रोल पंपाजवळ आली. चालकाला अचानक झोप लागली आणि बस भुयारी मार्गाच्या गेटवर जाऊन धडकली. त्यामध्ये चालकासह १६ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन गर्भवती व चार लहान मुलांचा समावेश आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी गोपीनाथ पठारे, प्रमोद सावंत घटनास्थळी आले. त्यांनी त्वरित अग्निशमन दल त्याचबरोबर रस्ते विकास महामंडळाचे शीघ्र कृती दल बोलवले. या दोघांनी इतर नागरिकांच्या साह्याने मदत कार्य सुरू केले. इतकेच नाही तर चार रुग्णवाहिका बोलावून घेतल्या. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी याशिवाय नियंत्रण पक्षाचे कर्मचारी घटनास्थळी आले. यानंतर प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे एक तासांपूर्वी या बसचा चालक बदलला होता.