ठाणे - भाजपाने कांजूरमधील मेट्रो कारशेडला केलेल्या विरोधाचे पडसाद ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत बुधवारी उमटले. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी बुलेट ट्रेनचा प्रकल्पच दप्तरी दाखल केला. तर भाजप नगरसेवकांनी यावेळी मौन धारण केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जागा संपादनाच्या वेळी होता विरोध -
बुलेटट्रेनला लागणाऱ्या जागा संपादनाच्या वेळी दिव्यात मनसेने आणि ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविला होता. त्यामुळे बुलेटट्रेनच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र, बुलेटट्रेनसाठी मौजे शीळ येथील सर्व्हे क्र ६७/ब/५ हा भूखंड हवा आहे. हा भूखंडाचे क्षेत्रफळ ३८४९ चौरस मीटर असून मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याखालील क्षेत्राचा मोबदला आकारून ही जागा नेशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन (बुलेटट्रेन) साठी वापरात आणण्याची अनुमती देण्याचा विषय आणि त्या भूखंडाचा मोबदला निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेत चर्चेला आणला होता. मात्र, त्याला दोन दिवस बगल देण्यात आली. अखेर बुधवारी झालेल्या महासभेत बुलेट ट्रेन प्रकल्पच दप्तरी दाखल करण्यात आला आहे.
भाजप नगरसेवकांचे मौन -
ठाणे महापालिकेने बुलेट ट्रेनचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. तर याच बुलेट ट्रेनच्या भूसंपादन सर्व्हेच्या वेळी दिव्यातील ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केला होता. यापूर्वी चारवेळा बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला ठाणे महापालिकेने लांबणीवर टाकले होते. बुधवारी झालेल्या महासभेत बुलेट ट्रेनला आवश्यक असलेल्या पालिकेच्या भूखंडाच्या मोबदल्याच्या निश्चितीचा प्रस्ताव पटलावर येताच शिवसेनेने बुलेटट्रेनचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. यावेळी सभागृहात भाजप नगरसेवकांची उपस्थिती होती. नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनला ठाणे महापालिकेने केराच्या टोपलीत टाकला. यावेळी एकाही भाजप नगरसेवकाने याला विरोध केला नाही.
कांजूरच्या मेट्रो कारशेडच्या विरोधाचा काढला वचपा-
आरे कॉलोनीत मेट्रोचे कारशेड प्रस्तावित होते. मात्र, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरण प्रेमी आणि सेवाभावी संस्थांनी आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे मेट्रोचे कारशेड कांजूरच्या मोकळ्या भूखंडावर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कांजूरच्या भूखंडावर प्रत्यक्षात कामही सुरु झाले. मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु असतानाच भाजप नगरसेवकांचा विरोध आणि न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मेट्रो कारशेडचे सुरु झालेले काम बंद पडले. भाजपच्या आक्रमक भूमिका आणि विरोधाने कारशेडचे काम बंद पडल्याने ठाण्यात याचे पडसाद उमटल्याचे स्पष्ट चित्र आहे.