ठाणे : पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'मुंबई - अहमदाबाद' बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित जमीनीच्या मोजणीसाठी गेलेल्या भिवंडी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि बुलेट ट्रेन निमशासकीय अधिकाऱ्यावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (आज) बुधवारी दुपारच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील खारबाव गावच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्योधन गणपत काटे आणि मारुती उर्फ बाळा काटे अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
दोन अधिकारी गंभीर - उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार पदावर कार्यरत असलेले परिक्षीत कांबळे आणि बुलेट ट्रेन निमशासकीय संस्थेचे प्रतिनिधी पराग पाटील हे दोघे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पबाधीत होणाऱ्या तालुक्यातील मौजे खारबाव येथील सर्व्हे नं.३७९/४,२६१/९,२९०,२९४,३७९ पै,२८४/२२,२६१/९,३६५/७,३५७ या जमिनीची फेर चौकशी मोजणीचे कायदेशीररित्या शासकीय काम ३६५/७ पासून २०० मीटर अंतरावर असलेल्या जागेत आज दुपारच्या सुमारास पार पाडत होते. त्यावेळी अचानक त्यांना मोजणीच्या कामात अडथळा निर्माण करून शाब्दिक बाचाबाची करून दहशत निर्माण केली. हल्लेखोर एवढ्याच नाही थांबले तर अधिकारी कांबळे यांना ठोश्याबुक्क्याने मारहाण केली. तर बुलेट ट्रेन निमशासकीय संस्थेचे प्रतिनिधी पराग यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करत गंभीर जखमी केले.
गुन्हा दाखल - दरम्यान हल्लेखोराच्या हल्ल्यात बुलेट ट्रेनचे अधिकारी पराग गंभीर जखमी असून त्याच्यावर भिवंडी शहरातील सिम्पथी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्या प्रकरणी अधीकारी परिक्षीत कांबळे यांच्या फिर्यादीवरून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.