ठाणे - अंबरनाथ पश्चिम भागातील एका बांधकाम व्यावसायिकाने स्वतःवरच गोळीबार करण्याची दोन शुटरला सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्या बांधकाम व्यावसायिकाने शुटरलाच पिस्तुल पुरवत गोळीबार करण्यास सांगितल्याचे उघडकीस आल्याने अंबरनाथ पोलिसांनी याप्रकाणातील दोघा आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद हुसेन आणि सुखविंदर सिंग असे अटक केलेल्या शुटरची नावे आहेत. तर कमरुद्दीन खान असे स्वतःवर गोळीबार करण्यासाठी सुपारी देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच नाव आहे.
कार्यालयाच्या खिडकीतून केला होता गोळीबार : बांधकाम व्यावसायिक आरोपी कमरुद्दीन खान आणि नियाज सिद्दीकी यांच्यात एका जागेवरून वाद सुरु आहे. त्यातच नियाज सिद्दीकी या बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी आरोपी कमरुद्दीन याने स्वतःवर गोळीबाराचा प्लॅन शिजवला. त्यानुसार कमरुद्दीन खान यांच्यावर २४ एप्रिलला कॉ-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या कार्यालयात बसले असता त्यांच्यावर अज्ञात शुटरने कार्यालयाच्या खिडकीतून गोळीबार केला होता. मात्र गोळीबार करताना गोळी भितींवर झाडली होती. त्यातून पोलिसांना संशय आला होता. शिवाय गोळीबाराचा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी मोबाईल नंबरच्या लोकेशन वरून मोठ्या शिताफीने मोहम्मद हुसेन आणि सुखविंदर सिंग या दोघा शुटरला 6 मे रोजी अटक केली.
बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान फरार : अटक शुटरकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता कमरुद्दीन यानेच गोळीबार करायला सांगितला होता. अशी दोन्ही शुटरने पोलिसांना कबुली दिली. या दोघा शुटरकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल, काही जिवंत काडतुसे आणि बाईक जप्त करण्यात आली आहे. मात्र कमरुद्दीन खान हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.
हेही वाचा - जेवण न दिल्याने मुलाने केली आईची हत्या, सांगलीतील धक्कादायक घटना