ठाणे - वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भूलभुलैय्या सुरू आहे. यामुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल. भाजपला धूळ चारायची असेल, तर वंचित बहुजन आघाडीने बहुजन समाज पक्षासोबत यावे असे वक्तव्य बसप प्रदेश अध्यक्ष दयनंद किरतकर यांनी केले आहे. बसप महाराष्ट्रातील सर्व जागांवर निवडणूक लढेल अशी माहीत त्यांनी दिली
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशिराम यांच्या जयंतीनिमीत्त कल्याण पूर्व येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात किरतकर बोलत होते. यावेळी किरतकर म्हणाले, की रक्ताने कुणी बाबासाहेबांचा वारसदार होत नसतो. बाबासाहेब एक विचार आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती झाली आहे. महाराष्ट्रातही दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. बसप महाराष्ट्रात सर्व जागावर निवडणूक लढणार असल्याचेही किरतकर म्हणाले.
बसपने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यासंबंधी विचारणा केली. पण, ते चर्चेस तयार नाहीत असे किरतकर यांनी सांगितले. बहुजन वंचित आघाडीमुळे मतविभाजन होईल. याचा फायदा भाजपला होईल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व प्रभारी ना. तु. खंदारे, महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव दयानंद किरतकर, सुनील खांबे, झोन प्रभारी अलामभाई, सुनील मडके, प्रदीप वाघ, शानखान, विद्याधर तीरतावडे, शहीद अन्सारी, अशोक गायकवाड, रवींद्र केणे, विश्वकर्मा, कासारे, शोभा इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.