ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक १२ वर्षीय मुलगी ही मूळची उत्तरप्रदेशमधील भदोही जिल्ह्यात कुटूंबासह राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने तिच्या वडिलांनी तिला उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या भाऊ आणि वहिनीकडे तिच्या पालनपोषणची जबादारी दिली होती. त्यातच मृत बहिणीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. मात्र तिला येत असलेल्या पाळीबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तिच्या कपड्यावर मासिक पाळीमुळे रक्तस्त्राव होऊन कपड्यांवर रक्ताचे डाग पडत होते.
बहिणीला बेदम मारहाण केली : मात्र, हे डाग पाहून तिच्या वहिनीने नवऱ्याला चुकीची माहिती देऊन सांगितले की, तुमच्या लहान बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध आहे. तसेच शारीरिक संबंध ठेवल्याने हा रक्तस्त्राव होत असल्याचे वहिनीने सांगितले. त्यामुळे मृतक बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निर्दयी भावाने सलग चार दिवस तिला लाथा बुक्क्यांनी, स्टीलच्या पकडीने तोंडावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत ती घरातच बेशुद्ध पडल्याचे पाहून ७ मे रोजी रविवारी तिला भावानेच मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला : धक्कादायक बाब म्हणजे पीडित बहिणीच्या गुप्त भागातून मासिक पाळीमुळे रक्त येत होते. त्याबाबत आरोपी भावाने तिच्याकडे विचारणा केली होती. मात्र मृतक बहिणीला या विषयी काहीच माहिती नसल्याने ती काहीही बोलत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या निर्दयी भावाने राहत्या घरीच सलग चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, १२ मे रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे उल्हासनगर शहर हादरले असून निर्दयी भावाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.