ठाणे- विवाहित प्रेयसीसोबत राहण्याचा तगादा लावणाऱ्या प्रियकाराला नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकाराने प्रेयसीच्या आईवर तलवारीने हल्ला केला. ही घटना काल सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास उल्हासनगरातील कॅम्प क्र. ४ मध्ये घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सोनू उर्फ नरेश गंगावणे (वय.२८) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प क्र. ४ परिसरात ४५ वर्षीय महिला तिच्या ३० वर्षीय मुलगी व तिच्या दोन मुलांसोबत राहाते. मुलगी पतीपासून विभक्त झाल्यानंतर गेल्या ७ वर्षापासून ती आपल्या दोन मुलांसोबत आईकडे राहते. त्या विवाहित महिलेवर तिच्याच परिसरात राहणारा आरोपी सोनू उर्फ नरेश हा तरूण प्रेम करत होता. गेल्या वर्षभरापासून तो त्या विवाहित महिलेच्या मागे लागून तिच्यासोबत राहण्यासाठी तगादा लावत होता. त्याच्या प्रेमाला त्या विवाहित प्रेयसीच्या आईचा विरोध होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे, आरोपी सोनू हा खूपच संतापला होता.
काल सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास सोनू प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. त्यावेळी तिची आई घरात होती. आरोपी सोनूने तिच्याकडे तिच्या विवाहित मुलीची चौकशी करून तिला मला भेटायचे आहे, असे बोलताच त्या मुलीच्या आईने त्याला विरोध केला. त्यामुळे, संतापलेल्या आरोपी सोनूने तलवारीने मुलीच्या आईवर ४ ते ५ वेळा वार केला. यावेळी महिलेने जीव वाचविण्याच्या उद्देशाने दोन्ही हाताने ते वार अडवले. मात्र या हल्ल्यात मुलीच्या आईच्या उजव्या हाताच्या मनगटावर व तळहातावर तसेच डाव्या हाताच्या कोपऱ्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी सोनू याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून व.पो.नि. सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.ईश्वर कोकरे, पो.उप.नि.योगेश गायकर, पो.हवा. संजय सुर्वे, संतोष भुंडरे, मायकल फ्रान्सीस, पो.ना. अनिल ठाकूर, प्रविण पाटील, रवी गावीत, विजय बनसोडे यांनी फरार सोनू उर्फ नरेशचा शोध घेवून त्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास स.पो.नि. ईश्वर कोकरे करत आहेत.
हेही वाचा- माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची 'ती' कारवाई वादाच्या भोवऱ्यात