ठाणे - बदनामी केल्याच्या संशयातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचे डोके जमिनीवर आपटून हत्या केल्याची घटना उल्हासनगर शहराच्या कॅम्प क्रमांक चार येथील शनी मंदिराच्या मागे घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे आरोपी मित्रावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली आहे. किरण म्हात्रे (वय 23 वर्षे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुल, असे मृत मित्राच नाव आहे.
राहुलचा जागीच मृत्यू...
उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक चार येथील मराठा सेक्शन परिसरात मृत राहुल व आरोपी किरण राहत असल्याने दोघे मित्र होते. त्यातच आज (सोमवारी ) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी किरणने माझी बदनामी तू करतो याचा राग मनात धरून मृतक राहुलचे डोके जमीनीवर आपटून डोक्याला जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
काही तासातच आरोपीला केली अटक...
तर घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांच्यासह पथकाने काहीच तासातच सापळा रचून आरोपी किरण म्हात्रे याला अटक केली आहे, अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
हे ही वाचा - VIDEO : लग्न सोहळा सुरु असतानाच मंडपाला भीषण आग; २५ वाहने जळून खाक; भिवंडीतील घटना