नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबा व्यावसायिकांवर संकट कोसळल होते. मात्र, देशात आणि परदेशात सद्यस्थितीत हापूस आंब्याला मोठी मागणी मिळत असल्याने आंबा व्यावसायिकांवर संकट टळलं आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. तसेच बाजार भाव योग्यरीतीने मिळाल्यामुळे आंबा व्यवसायिक समाधान व्यक्त करीत आहेत.
आज नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हापूस आंब्यांच्या पन्नास हजार पेट्या इतकी विक्रमी आवक झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने कित्येक लोक आंब्याचा रस बनवतात त्यामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात स्थानिक बाजारपेठ आणि परदेशातही खरेदी झाली आहे. तसेच गेल्या आठ दिवसापासून हापूस आंब्याला चांगला बाजार भाव मिळत आहे.
कोरोनामुळे हापूस आंब्याच्या मालाला बाजारात उठाव नव्हता. यामुळे कोकणातील शेतकरी व आंबा व्यापारी यांना चिंता वाटत होती मात्र ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कोकणातील शेतकरी आंबा व्यावसायिक समाधान व्यक्त करीत आहेत. गेल्या आठवड्यापासून आंब्याचे बाजार भाव 500 रुपयांनी वाढले आहेत, अशी माहिती फळ बाजार समितीचे संचालक व व्यापारी संजय पानसरे यांनी दिली आहे.