नवी मुंबई - शिवसेनेने सत्तेसाठी आपली सर्व तत्व गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या एका कोपऱ्यात ठेवली आहेत. हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.
हेही वाचा... तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे
महाजनादेशाचा अपमान करुन सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द या सरकारने दिला होता. पण तो शब्द पाळला नाही. आज राज्यात महिला असुरक्षित आहेत. राजरोसपणे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षेचा दिल्या जाण्याचा कालावधी कमी होता. त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचा धाक होता. मात्र, आज राज्यात कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आज राज्यातील जनतेची ज्या प्रकारे फसवणूक सुरु आहे, त्यामुळे आता सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करणार आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. आगामी नवी मुंबई महानगरपालिका आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह सर्व विरोधक एकत्र येतील. या तिघांविरोधात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल. दोन्ही मनपामध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होईल. आपला महापौर विराजमान होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा... वैयक्तिक स्वार्थासाठी 'त्यांनी' जनादेशाचा अपमान केला - नड्डा
महाराष्ट्रामध्ये विश्वासघातामुळे मुख्यमंत्री न होता, राज्याचे विरोधी पक्ष नेते झालेले देवेंद्र फडणवीस, असा फडणवीस यांचा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी केला. 'मी सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले पाहिजे. यासाठी म्हणून प्रचंड मेहनत घेण्यात आली. शिवसेना भाजप मिळून सरकार स्थापन करणार होते. दिवाळीनंतर जनादेश शिवसेना भाजपने सरकार स्थापन करावा असा होता. मात्र, एक अभद्र युती महाराष्ट्रात झाली', असा घणाघात पाटील यांनी केला.
भाजप शिवसेना सरकार यावे, अशी लोकांची इच्छा होती. मात्र, भाजपच्या हिंदुत्व धारण करणाऱ्या मित्राने दगाबाजी केली. उध्दव ठाकरे यांना सोनिया गांधी शरद पवार यांना भेटायला वेळ होता. मात्र शिवसेनेकडे देवेंद्र फडणवीस यांचा फोन उचलायला वेळ नव्हता. संजय राऊत यांनी म्हटले होते, आम्ही अगोदरच भाजप बरोबर जायचे नाही, असे ठरवले होते. अनेक लोकउपयोगी प्रकल्प रद्द करण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. बाळासाहेब जिवंत असताना सावरकरांविषयी बोलायची कोणाची हिंमत नव्हती. पण सद्यस्थितीत सावरकरांचा अवमान केला जात आहे. हिंमत असेल तर वेगळे लढा, असाही इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच आम्ही इतके कणखर आहोत की, आमच्या विरोधात लोक एकत्र येतात. नवी मुंबई व औरंगाबादची निवडणूक आम्हीच जिंकणार असा, विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा... 'पुढे महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे भाजपचा एकट्याचा लढा असेल'