ठाणे - भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे भिवंडी भाजपचे जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेट्टी मोठे शक्तिप्रदर्शन करीत प्रांत कार्यालयात पोहचले. त्याचवेळी त्यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा शिवसेनेचे रुपेश म्हात्रे निवडून आले आहेत. तत्पूर्वी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संतोष शेट्टी यांना अवघ्या ३३९३ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे शेट्टी यांनी यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्वतयारी करीत मोर्चेबांधणीस सुरुवात केली. मात्र, युतीची घोषणा झाली आणि त्यांच्या पदरी निराशा आली. अपेक्षेप्रमाणे शेट्टी यांनी भाजप शहराध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...
संतोष शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कामतघर, पदमानगर, गणेश टॉकीज, यामार्गे प्रांत कार्यालय येथेपर्यंत पदयात्रा काढित जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, प्रांत कार्यालय या ठिकाणी पोहचताच काँग्रेस पक्षाकडून अखेरची यादी दिल्ली येथून जाहीर झाली ज्यामध्ये संतोष शेट्टी यांच्या काँग्रेस उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
हेही वाचा -विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन
संतोष शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी माझ्या समर्थकांच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. म्हणूनच समाजातील सर्वच घटकातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्या सोबत निघाले होते. काँग्रेस पक्षातील निष्ठावंत व ज्यांना पक्षाबद्दल खरी कळकळ आहे. त्यांच्या आग्रहानंतर मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मला आज काँग्रेस पक्षाकडून मिळालेली उमेदवारी ही शहरातील इमानदार, निष्ठावंत सच्च्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. त्यास तडा जाऊ न देण्याचा विश्वास मी देत आहे. यावेळी मतदान जातीयवादावर नसून विकासावर होणार असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.