ठाणे - राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहे. या घटनांना राज्य सरकारसह राज्यातील गृह विभाग जबाबदार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांची भूमिका जाणून घेण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी प्रसार माध्यांमाशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर टीकाही केली आहे.
पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया
डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आरोपीवर कोठार कारवाईचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटनेत २३ आरोपींना अटक झाली आहे. याप्रकरणी दोषी आरोपींना अटक करण्याच्या सूचना पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. अशा प्रकारच्या घृणास्पद घटना घडू नये, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी छोट्या घटना घडल्या तरीही पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
डोंबिवलीत घडलेल्या सामूहिक बलात्कारची घटना संतापजनक आहे. तसेच डोंबिवलीत अशा प्रकारची घटना धक्कादायक असल्याचे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. सरकारच्या गृह विभाग आणि पोलीस यंत्रणेने विशेष प्रयत्न करून, यात लक्ष घातले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळेस दिला.
हेही वाचा - आसाम: पोलिसांसमोर मृतदेहाला तुडविणाऱ्या निर्दयी फोटोग्राफरला अटक