नवी मुंबई - मुंबई महापालिकेच्या देवनार व मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याने पेट घेतल्यानंतर तेथे आग धुमसते व त्याचा प्रचंड त्रास नवी मुंबईकरांना सोसावा लागतोय. त्यामुळे याप्रश्नी मुंबई महानगरपालिका प्रशासनाशी बोलून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
आमदार गणेश नाईक हे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात गेले असता त्यांनी कोविड जरी आटोक्यात येत असला तरी त्या संदर्भात काळजी घेणे थांबवू नये. तसेच अतिरिक्त काळजी म्हणून हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात यावेत ही विनंती नाईक यांनी बांगर यांना केली. तसेच शिक्षण व कोविड काळात ओढवलेली स्थिती याची चर्चाही त्यांनी आयुक्तांशी केली. त्याच बरोबर मुलुंड व देवनार येथे असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड व तेथे जाळण्यात येणारा कचरा व पसरणारा विषारी वायू यामुळे नवी मुंबईतील नागरिक यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे याप्रश्नी मुंबई महापालिकेशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी सूचनाही नाईक यांनी बांगर यांना केली.