ठाणे - महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र, कोरोनाच्या काळात राज्यातील राजकारण जोरात सुरु आहे. ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक 15 जुलैला तर पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी 5 जुलैला निवडणुका घेण्यात येणार आहेत. भिवंडी पंचायत समितीच्या निवडणुकीत सेना - भाजपमध्ये छुपी युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निष्ठावंत सेना सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
कोरोनाचा फैलाव वाढला असला तरी भिवंडीतील ग्रामीण राजकारणाचा पारा देखील चढलेला दिसत आहे. विशेष म्हणजे, राज्यात सेना भाजपने एकमेकांपासून फारकत घेतली असल्याने स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र, भाजपला एकहाती मात देण्यासाठी भिवंडीत महायुतीचा फॉर्म्युला अडीच वर्षांपूर्वीच अस्तित्वात आला होता. भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकत्र येत भिवंडी पंचायत समिती निवडणूक लढवली गेली होती. महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे पंचायत समितीवर एकहाती दावा करणाऱ्या भाजपला 19 जागांवर समाधान मानावे लागले होते.
एकूण 42 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी पंचायत समितीत भाजप 19, शिवसेना 19, काँग्रेस 2, मनसे 1 राष्ट्रवादी 1 असे पक्षीय बलाबल निर्माण झाले. अडीच वर्षांपूर्वी सभापती निवडणुकीत काँग्रेसचे दोन सदस्य भाजप गोटात गेले असल्याने भाजप व महायुतीकडे 21-21 अशी सम-समान सदस्य संख्या असल्याने या निवडणुकीत चिठ्या उडवून सभापती पद घोषित करण्यात आले होते. ही नशिबाची चिठ्ठी भाजप उमेदवाराच्या नावाने निघाल्याने भाजपच्या रवीना रवींद्र जाधव या सभापती झाल्या होत्या.
दरम्यान सध्या पंचायत समितीत सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने सेनेच्या अनेक सदस्यांनी सभापती पदावर आपली इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, शिवसेना छुप्या मार्गाने भाजपशी युती करत पंचायत समितीची सत्ता स्थापन करण्याच राजकारण सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या अनेक सदस्यांचा भाजप बरोबरच्या युतीस जाहीर नकार आहे. जर वरिष्ठांनी आपल्यावर भाजपसोबत युती करण्यासाठी जास्त आग्रह धरला, तर आपण थेट आपला सदस्य पदाचा राजीनामा देऊ, अशा भूमिकेत अनेक सेना सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेकडे 20 सदस्य संख्या आहे. राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार सेनेत गेल्याने सेना सदस्य संख्या 21 वर पोहचली आहे. त्याच बरोबर मनसेचा एकमेव उमेदवार देखील महायुतीमुळे सेनेसोबत आहे. अडीच वर्षांपूर्वी फुटून भाजपशी हातमिळवणी केलेले काँग्रेसचे दोन सदस्य देखील सेने सोबत असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे पंचायत समितीत सेनेची ताकद वाढली असून एकूण सदस्य संख्या 23 वर पोहचली आहे. तर भाजप 19 वरच अडकली आहे. त्यातच भाजपचे दोन उमेदवार सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळत असल्याने भिवंडी पंचायत समितीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे आपली भाजपसोबत युती नको, असा पवित्रा सेना सदस्यांनी घेतला आहे. मात्र, शिवसेनेचे वरिष्ठ आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.