नवी मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्या अनुषंगाने राठोड यांची हकालपट्टी व्हावी म्हणून आज नवी मुंबई भाजपच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : ठाण्यात भाजपा महिला मोर्चाच्यावतीने 'रस्ता रोको'
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. यातील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा भाजपने केला होता. संजय राठोड यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. आज नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या बंगल्यासमोर वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच, सानपाडा, वाशी, एपीएमसी मार्केट येथील रोडवर देखील भाजपच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
आंदोलनादरम्यान एपीएमसी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवले व ताब्यात घेतले. नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आमदार श्वेता महाले, माजी नगरसेविका विजया घरत, भाजप नेते दत्ता घंगाळे, दुर्गा ढोक व भाजप कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाजप आमदार श्वेता महाले व नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आंदोलन हे आणखी तीव्र करू, असे म्हंटले.
हेही वाचा - फाउंटन हॉटेलमध्ये सापडले पाच कोरोना रुग्ण; पालिकेकडून हॉटेल सील