ठाणे : भिवंडी शहरातील नजराणा कंपाऊंड परिसरातील एका मोठ्या झाडावर घार पक्षी गंभीर जखमी अवस्थेत पतंगाच्या मांज्यात त्याचे पंख अडकून पडल्याचे एका नागरिकाला १९ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास दिसले. त्यानंतर त्या नागरिकाने भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयात संपर्क घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन या जखमी घारीला बांबूच्या साह्याने ३० फूट उंच झाडाच्या फ़ांदीवरून खाली उतरवले. त्यावेळी ही जखमी घार खूपच गंभीर अवस्थेत असल्याने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाचे अधिकारी सुनील लहकरे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने या जखमी घारीला घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घारचा एक पंख मांज्यात अडकून पूर्ण कापला गेला असून अश्याच अवस्थेत तो १० ते १२ तासापासून झाडाच्या फांदीला लटकत होता.
दुचाकीस्वार जागीच ठार : खळबळजनक बाब म्हणजे, मकरसंक्रांतच्या दिवशीच संजय हजारे हे दुचाकी चालवत असताना पतंगीचा मांजा त्यांच्या मानेला अडकला. त्यांचा गळा कापल्या गेल्याने ते जागीच ठार झाले. तर दुसरीकडे या चीनी मांज्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे चीनी मांज्यावर बंदी असतानासुद्धा पतंग उडविण्यासाठी या मांज्याचा वापर होत असल्याने दररोज अपघात घडत आहेत. दरम्यान, मकरसंक्रातच्या दिवशी घडलेल्या घटनेनंतर महापालिका आणि पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत भिवंडी शहरातील मांजा विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांकडून मांजा जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मांजा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
बंदीनंतरही नायलॉन मांजाची विक्री जोरात: आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चीनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो. या दोऱ्यात एकदा पक्षी अडकल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही. पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी गरज असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वीही गुन्हे दाखल : जिल्ह्यात विविध शहरात पंतगांच्या विक्रेत्यांकडे जात स्थानिक पालिका कर्मचाऱ्यांनी मांजाची तपासणी करुन नॉयलॉन मांजाबाबत शहानिशा करावी अशी मागणी होत आहे. तर यापूर्वी कल्याण, भिवंडी, उल्हासनगर शहरातील मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाले. तरी देखील मांजामुळे अश्या अपघाताच्या घटना घडतच असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : Air India News एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड, डीजीसीएकडून कारवाई