ठाणे - ठाण्यात सध्या नाल्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यासाठी जागोजागी प्रचंड मोठे खड्डे खणून ठेवण्यात आले आहेत. त्यातच आता पावसाला सुरुवात झाली असून, खोदलेल्या या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. ठाण्यातील कोरम मॉल येथील एका नाल्यात पडून बाईकस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन युवकाचे शव बाहेर काढले.
सुरक्षितता बाळगण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
रात्रीच्या वेळी या नाल्याजवळ सुरक्षारक्षक किंवा बॅरिकेट्स देखील लावलेले नसल्याने सतत अपघात होत असतात. असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मुंबई आग्रा हायवेला लागूनच असलेल्या रस्त्यावर हे काम सुरु असून, इथे गाड्यांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी योग्य ती सुरक्षितता बाळगावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नाल्याबाबत प्रशासन निद्रिस्त
कोरम मॉल शेजारील या नाल्याचा प्रवाह बदली करून बाजूच्या बांधकाम व्यवसायीकाला फायदा करून देण्यात आल्याचा आरोप अनेक वर्षांपूर्वी करण्यात आला होता. या संदर्भात चौकशी समितीही गठीत करण्यात आलेली होती. मात्र त्या चौकशी समितीचा कधी अहवाल आलाच नाही. यासोबत या परिसरातील चाळीत राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात या नाल्याच्या बदललेल्या प्रवाहामुळे पाणी शिरते आणि दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे हायवे आणि त्या शेजारील सर्विस रोडच्या खालून जाणारा नाला कधी पूर्ण होणार? असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.
हेही वाचा - हिंगोलीः सेनगाव कार अपघात, पुलाच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर अखेर गुन्हा दाखल