ठाणे - राज्यात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेरोजगारांसाठी रोजगाराची मोठी योजना उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर करणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भिवंडीत दिली. भिवंडीतील बीएनएन महाविद्यालय संचलित पद्मश्री अण्णासाहेब जाधव कौशल्य विकास केंद्रामार्फत आयोजित रोजगार मेळाव्याचे उदघाटन मंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते करण्यात आले.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना रोजगार योजना यापुढे प्रभावीपणे राबवणार असल्याचेही सांगितले. तर, कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजासाठी विशेष कार्यक्रम राबवला जाणार असल्याचे सांगत त्या माध्यमातून कुशल रोजगारक्षम वर्ग तयार करण्यात येणार असल्याने तरुणांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
पद्मश्री अण्णासाहेब जाधव कौशल्य विकास केंद्रामार्फत तब्बल 45 व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात असून या रोजगार मेळाव्यासाठी आज तब्बल 650 विद्यार्थ्यांनी नोंद करण्यात आली. यामध्ये बँक, आयटी, रिटेलर, कॉलसेंटर आदी 28 कंपन्यांचे प्रतिनिधीं रोजगार मेळाव्यात थेट मुलाखतीद्वारा निवड करण्यासाठी उपस्थित होते. पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास महापौर प्रतिभा विलास पाटील, उपायुक्त दीपक कुरळेकर, कार्याध्यक्ष बि डी काळे, प्राचार्य डॉ अशोक वाघ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भगवान टावरे यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हेही वाचा -
43 वे UNHRC सत्र : पाकिस्तानी लष्कर हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू, पोस्टर झळकले