ठाणे - एकीकडे परिचारिका दिन मोठ्या आदराने साजरा होत असतानाच दुसरीकडे एका परिचारिकेला आणि तिच्या पतीला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. कळवा येथील रमाबाई सोसायटीमध्ये एका दाम्पत्याला समाजकंटकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक महिन्यांपासून राजू शेट्टी नामक स्थानिक गुंड त्याच्या काही साथीदारांसोबत रमाबाई सोसायटीच्या आवारात टेबल लावून राजरोसपणे जुगार खेळत आहे. अनेकजण येथे येऊन चरस, गांजा यासारख्या अंमली पदार्थांचे सेवन देखील करतात. तर त्यांनी येथील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने कोणीच त्यांना अडवण्याचे धाडस करत नाही. मात्र, कोरोनाच्या संकटातही सगळे नियम धाब्यावर बसवून मास्क न लावताच हे टोळके जुगार खेळत होते. हे सहन न होऊन काटे दाम्पत्याने 8 मे ला रात्री साडे नऊ वाजता हा प्रकार थांबवून तिथून निघून जाण्याचे आवाहन केले.
त्यावेळी काहीही ऐकून न घेता तेथील लोकांनी काटे दाम्पत्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. संगीता काटे यांना तर खाली पाडून अनेक महिलांनी मारल्याने त्यांनी कळवा पोलिसांत तक्रार केली. परंतु, पोलिसांनी काही सामान्य कलमे लावून या समाजकंटकांना फक्त समज देऊन सोडून दिले. त्यामुळे आता या पीडित दाम्पत्याने आपल्या जीवास धोका असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.