ठाणे- बसची वाट पाहणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीसमोर एका व्यक्तीने अश्लील हावभाव करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याची घटना घडली आहे. ही घटना घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा बस स्टॉपवर घडली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी सिद्धेश्वर बाळाबसाहेब यमगर (वय ३५) या रिक्षा चालकास अटक केली आहे.
पीडित विद्यार्थिनी बुधवारी सकाळी घोडबंदर रोडवरील डोंगरी बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. त्यावेळी रिक्षाचालक सिद्धेश्वर बाळासाहेब यमगर (रा.हाजूरी दर्गा, वागळे इस्टेट) हा तेथे रिक्षा घेऊन आला. त्याने विद्यार्थिनीकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली आणि पँटची चैन उघडून विद्यार्थिनी समोर अश्लील चाळे देखील केले. तेव्हा या कृत्याचा विरोध करत पीडित विद्यार्थिनीने मोबाईलमध्ये रिक्षाचा फोटो काढला. त्यानंतर विद्यार्थिनीने भावाला बोलावून कासारवडवली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
रिक्षाचालक यमगर याने मंगळवारी देखील अशाच प्रकारे घाणेरड्या शब्दांचा वापर करून विद्यार्थिनी समोर अश्लील कृत्य केले होते. याप्रकरणी, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी तातडीने रिक्षाचालकाला शोधून त्याला अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
हेही वाचा- ठाण्यात बांधकाम व्यावसायिकावर लोखंडी रॉडने हल्ला; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल