ठाणे - काही अज्ञात तीन ते चार तरुणांनी एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील १७ सेक्शन परिसरातील चौकात घडली. तसेच या तरुणांनी अनेक वाहनांची तलवारीने तोडफोडही केली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कमल कजानिया (वय २२) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्का लागल्याच्या वादातून जोरदार हल्ला -
कमल हा मित्रांसोबत उल्हासनगर शहरातील १७ सेक्शन परिसरातील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी ५ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास आला होता. त्यावेळी तेथील टोळीतील तरुणांपैकी एकाला कमलचा धक्का लागला. यावरून शिवीगाळ करून वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, हल्लेखोर टोळीने थेट धारधार हत्याराने कमलच्या डोक्यावर वार करून दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात कमल गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाज आणि सरकार एकत्र येण्याची गरज : नीलम गोऱ्हे
या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी, मध्यवर्ती पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.