ठाणे - बदलापूरमध्ये भाजपच्या युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यासह दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यामागे ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात असून याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात हेमंत भोईर, श्रीधर भोपी, समाधान भोपी, अमोल भोईर हे चार जण गंभीर जखमी झाले असून या चौघांवर बदलापूरच्या भगवती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. मात्र, जलवाहिनी फोडल्याच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस सांगत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बदलापूर जवळील तालुक्यातील ढोके-दापोली ग्रामपंचायतमधील सेनेच्या हातातून भाजपने सत्ता खेचून घेतली होती. याच रागातून सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. हेमंत भोईर, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर भोपी आणी दोघे जण शिर्डीहून घरी परतत असताना ढोके दापोली परिसरात त्यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्राने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.
या हल्ल्यात हेमंत भोईर, श्रीधर भोपी, समाधान भोपी आणि अमोल भोईर हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांवर बदलापूरच्या भगवती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून सेना-भाजपमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.