ठाणे - शिळडायघर येथील दहीसर नाका भागामध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या मशीनमध्ये सुमारे १८ लाखांची रोकड होती, असे समजत आहे. याप्रकरणी सोमवारी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बँकेने मात्र याची साधी दखलही घेतली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.
शिळ परिसरातील दहीसर ग्रामपंचायत क्षेत्रात अॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन आहे. लॉकडाऊनमुळे रविवारी रात्री शुकशुकाट असल्याची संधी साधत, सात ते आठ चोरट्यांनी हे एटीएम मशीनच चोरून नेले. या एटीएम मशीनमध्ये 17 लाख 96 हजार 200 रूपये होते. याप्रकरणी एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चोरटयांनी दरोडयासाठी वापरलेल्या चारचाकी वाहनाचा माग पोलीस काढत असून, लवकरच चोरांचा छडा लावला जाईल असा विश्वास शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकाच वेळी अनेक चोऱ्या..
डायघर पोलीस सध्या कोरोनाच्या कामांमध्ये व्यग्र असल्याची चांगलीच संधी चोरट्यांनी साधली आहे. याच रात्री आणखी तीन ठिकाणीही चोरीच्या घटना झाल्या आहेत. तसेच, याआधी मागील आठवड्यात कल्याण मध्ये एटीएम चोरी करणाऱ्या टोळीला कल्याण पोलिसांनी पकडले होते.
हेही वाचा : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैदी बनवतायेत मास्क; लॉकडाऊनमध्येही करोडोंची कमाई