नवी मुंबई : काहींना खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटलमध्ये, कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल, वाशी येथील महानगर पालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
कार्यक्रम संपताच चेंगराचेंगरी : कार्यक्रमादरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यासपीठावरून उष्णतेचा उल्लेख केला होता, तरीही लोकांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये तापमान 42 अंशांच्या आसपास होते, असा उल्लेख केला होता. लाखोंच्या जमावामुळे वातावरणातील आर्द्रता आणखी वाढली होती. त्यातच कार्यक्रम संपताच चेंगराचेंगरी देखील झाली.
रुग्णांची घेतली मुख्यमंत्र्यांनी भेट : भरदुपारी रणरणत्या ऊन्हात कोणत्याही छताविना सदस्य मोकळया जागेत बसले होते, शिवाय जिथे बसले होते तिथे जवळपास पाण्याची सोय देखील नव्हती. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय आल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढली. त्यानंतर नागरिकांना डोकेदुखी चक्कर येणे व उलट्या अशा प्रकारे त्रास होऊ लागला. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे ज्या रुग्णांना कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्या रुग्णांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
मृताच्या वारसांना मदत जाहीर : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या अकरा लोकांच्या वारसांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. रणरणत्या उन्हात घेतलेल्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सोहळ्यात सामील झालेल्या 12 लोकांचा निर्जलीकरण झाल्याने उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तींचे नावे : महेश नारायण गायकर (वय 42, वडाळा मुंबई), स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, शिरसाटबामन पाडा विरार), तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, जव्हार पालघर), जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, म्हसळा रायगड), मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गिरगाव मुंबई ), श्रीमती कलावती सिद्धराम वायचळ (वय 46 वर्ष, सोलापूर), श्रीमती भीमा कृष्णा साळवी (वय 58 वर्ष, कळवा ठाणे), श्रीमती सविता संजय पवार (वय 42 वर्ष, मुंबई) श्रीमती पुष्पा मदन गायकर (वय 64 वर्ष, कळवा ठाणे), श्रीमती वंदना जगन्नाथ पाटील (वय 62 वर्ष, करंजाडे), एक अनोळखी महिला (वय 50 ते 55 वर्ष) असे मृत व्यक्तींचे नावे आहेत. एकूण 11 मृतदेह पैकी दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले आहे. एक मृतदेह बेवारस असून महिलेचा आहे, वारसाचा शोध चालू आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी 'हरवले व सापडले' समितीचे प्रमुख 7977314031 व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 022-27542399 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे