नवी मुंबई - सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आपल्यावर अन्याय होत आहे. तसेच मुद्दामहून काही पोलिसांकडून या प्रकरणी चालढकल केली जात असल्याचा तसेच आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न काही पोलिसांच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला असून, याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेचे एसीपी विनोद चव्हाण यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींना नेहमीप्रमाणे नवी मुंबई पोलीस अजूनही मदत करत आहेत. अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी ज्ञानेश्वर पाटील उर्फ राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची तात्काळ माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत व एसीपी संगीत शिंदे-अल्फान्सो यांना देणे गरजेचे असतानाही ती दिली गेली नाही. केसच्या तारखेला न्यायमूर्तींनी खटल्याची सध्याची माहिती मागितली त्यामुळे वकिलांना सांगण्याशिवाय पर्याय राहिला नाही. राज्याच्या पोलीस महासंचालकानी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचे कोर्टाचे कामकाज एसीपी संगीत शिंदे-अल्फान्सो यांनी बघावे, हा लेखी आदेश दिला असतानाही तपास अधिकारी एसीपी विनोद चव्हाण यांनी एसीपी संगीता शिंदे अल्फान्सो यांना का कळविले नाही? संपूर्ण देशात कर्फ्यू असतानाही नवी मुंबईतून दोन महिन्यापूर्वी रेल्वे विभागात बदली झालेले विनोद चव्हाण सिंगल ऑर्डरने नवी मुंबईत हजर कसे काय होतात ? व त्यांच्याकडे अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास कसा काय दिला जातो? असा सवाल करत यात गौडबंगाल असल्याचा आरोप केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या मानधनाचे बिल अद्याप दिले गेले नाही, याला सुध्दा क्राईम ब्रँच नवी मुंबईचे एसीपी विनोद चव्हाणच जबाबदार असून ते आरोपींना पाठिशी घालत आहेत. त्यामुळे एसीपी विनोद चव्हाण यांचे तात्काळ निलंबन व्हावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केली आहे.