ठाणे - नरेंद्र मोदी अमेरिकेला घाबरतात अन् आम्हाला सांगतात ‘घरमे घूस के मारगे’? अशी टीका असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर केली. ते भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ अरुण सावंत यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
इराणकडून पेट्रोल खरेदीसाठी अमेरिकेने भारताला मनाई केली. त्यावर मोदी अमेरिकेच्या राष्ट्रपतीला म्हणतात, ठीक आहे बॉस, याचाच अर्थ असा आहे, की मोदी डरपोक असून ते अमेरिकेला घाबरतात अन् आम्हाला सांगतात की घर मे घूस के मारेंगे ? कसली तुमची ५६ इंचाची छाती, आम्ही ट्रम्पला तर सोडाच, पण कुणाच्या बापालाही घाबरत नाही, अशा शब्दात एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भिवंडीच्या जाहीरसभेत मोदींची खिल्ली उडवली.
भिवंडी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शहरातील टावरे स्टेडियम येथे सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रकाश आंबेडकर, एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार वारिस पठाण यांच्यासह शेकडो नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
ओवेसींनी अभिनेता अक्षय कुमारने मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीचाही समाचार घेतला. ते म्हणाले, मोदींनी अभिनेत्याला मुलाखत दिली. मोदीच्या मते टिव्ही अँकर चांगले मुलाखत घेत नाहीत. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार याला मुलाखत घेण्यासाठी बोलवले. अक्षय कुमार विचारतो तुम्ही आंबा कसा खाता कापून की चोखून, हा काय प्रश्न झाला ? याला नमो टिव्हीचा अँकर बनवा, असे म्हणत त्यांनी अक्षय कुमारने मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीची खिल्ली उडवली. तर भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वीरमरण आलेल्या हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले. मात्र, भाजप अशा व्यक्तींवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे, अशा देशद्रोही प्रवृत्तीना महाराष्ट्राच्या नागरिकांनी हद्दपार केले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी या सभेप्रसंगी केले. भिवंडीच्या यंत्रमाग व्यवसायासाठी भाजप सरकारने कोणतेही प्रभावी धोरण बनवले नसल्यानेच आज भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला आला आहे, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी यावेळी दिली.