ETV Bharat / state

'अण्णाभाऊंना डॉ. बाबासाहेबांविषयी नितांत आदर; त्यांनी कम्युनिस्ट पक्ष कधीही सोडला नाही' - annabhau sathe 100th birth anniversary

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तसेच त्यांच्या विचारांविषयीही आदर होता. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांनी 1946 साली 'जग बदल घालूनी घाव' हे गीत लिहिले होते, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सांगितले. अण्णाभाऊ हे सुरुवातीपासूनच ते शेवटपर्यंत कॉम्रेडच होते आणि कम्युनिस्ट चळवळीत ते सक्रिय राहिले, असेही मोरे यांनी सांगितले.

annabhau sathe 100 th birth anniversary spl story etv bharat
अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष
author img

By

Published : Aug 1, 2020, 10:16 AM IST

ठाणे - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तसेच त्यांच्या विचारांविषयीही आदर होता. बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांनी 1946 साली जग बदल घालूनी घाव हे गीत लिहिले होते, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी सरचिटणीस कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सांगितले. अण्णाभाऊ हे सुरुवातीपासूनच ते शेवटपर्यंत कॉम्रेडच होते आणि कम्युनिस्ट चळवळीत ते सक्रिय राहिले, असेही मोरे यांनी सांगितले. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'जग बदल घालूनी घाव' या मालिकेच्या माध्यमातून कॉम्रेड सुबोध मोरे यांच्याशी संवाद साधला. या विशेष संवादात त्यांनी अण्णाभाऊंचे जीवन, साहित्य, तसेच त्यांच्याबाबत समाजात असलेल्या अनेक वादांवर भाष्य केले.

  • माटुंगा ते रशिया असा राहिला अण्णांचा जीवनप्रवास -

कॉम्रेड सुबोध मोरे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. मात्र, आजही येथील उच्चवर्गीयांना त्यांच्या कार्याची आणि साहित्याची कल्पनाही नाही. ही मोठी शोकांतिका आहे. ते लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून राज्यभर फिरले. त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही. शब्दशः त्यांनी धुळाक्षरे गिरवली आणि आज आपल्यासमोर त्यांचे प्रचंड लेखन आहे. मात्र, उच्चविद्याविभूषितही त्यांच्यापुढे थिटे वाटतात.

अण्णाभाऊ हे कामगार चळवळीत सहभागी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता. 'एक जुटीचा नेता झाला कामगाराचा यार, बदला यार दुनिया सारी दुमदुमली ललकार' आण्णांचे हे गाणे प्रत्येक कामगाराला आपलं वाटत होतं. आण्णांना कम्युनिस्ट पक्ष, कामगार संघटनांची साथ लाभली नसती तर ते इतके मोठे लेखक, कलावंत म्हणून समोर आले नसते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आण्णा 1932-33 साली वयाच्या 12-13 व्या वर्षी मुंबईत आले. याच वयात त्यांनी मिलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ते माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहायला होते. अतिशय गलिच्छ, दुर्गंधयुक्त वातावरण असलेल्या वस्तीत ते राहात होते. तिथेच त्यांनी पहिले गीत लिहिले. त्यांचे पहिले गीत हे मच्छरावर आहे. येथेच त्यांची वैचारिक जागृती झाली. माटुंगा लेबर कॅम्पमध्येच कम्युनिस्टांशी त्यांचा संबंध आला. कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. कम्युनिस्टांच्या स्टडी सर्कलमधून ते कार्यकर्ता म्हणून घडले. येथेच त्यांनी 'दलित युवक संघ' नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. त्यांचे राजकीय सामाजिक भान हे कम्युनिस्ट चळवळीसोबत काम करताना तयार झाले.

अण्णाभाऊंनी दुसरा पोवाडा हा स्पेनवर लिहिला होता. आण्णा मुंबई कामगार, मशालसारखे वृत्तपत्र वाचायचे. त्या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय जगतातील घडामोडींबद्दल माहिती होत होती. त्याकाळात स्पेनमध्ये फॅसिस्ट राज्यकर्त्यांविरुद्ध लढा सुरु होता. त्यावर त्यांनी पोवाडा लिहिला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, हिटलरने सोवियत युनियनवर हिटलरने हल्ला केला केला होता. या पार्श्वभूमीवर, त्यांनी त्यांचा 'स्टॅलिनचा पोवाडा' लिहला. त्यांचा तो पोवाडाही खूप गाजला. या पोवाड्यातून त्यांचे नाव सर्वत्र झाले. गिरण्यांच्या गेटवर ते गात होते. कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रातून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत होत्या. ते कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र लोकयुद्ध तसेच 'युगांतर' नावाच्या नियतकालिकामध्येही लिहित होते. असा अण्णाभाऊंचा प्रवास सुरु झाला आणि तो रशियापर्यंत पोहोचला होता.

VIDEO : माटुंगा ते रशिया असा राहिला अण्णांचा जीवनप्रवास

  • संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंचे मोठे योगदान -

अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान मोठे आहे, असे कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सांगितले. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, द. ना. गवाणकर हे तीन शाहीर तेव्हा प्रसिद्ध होते. आजच्या सारखे त्याकाळात माईक नव्हते. मात्र, हे शाहीर आपल्या पहाडी आवाजात मैदान गाजवत होते. असेही सांगितले जाते की, मुंबईबाहेर सभा असेल आणि लोकांना कळाले की अण्णाभाऊ येणार आहेत तर लोक बैलगाड्या घेऊन सभेला हजर राहात. 'मुंबईची लावणी' - 'मुंबईत उंचावरी। मलबार हिल इंद्रपुरी।। कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती।। परळात राहणारे। रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन पोट भरती।। आणि माझी मैना गावाकडे राहिली, हि लावणी त्या काळात खूप गाजली.

अण्णांचे लाल बावटा पथक हे मुळात धंदेवाईक कलापथक नव्हते. ते कामगारांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायचे. अण्णांच्या कार्यक्रमांना दुरवरुन लोक यायचे. पारंपरिक तमाशा प्रकाराला अण्णाभाऊ साठेंनी छेद दिला. त्याचे रुपच त्यांनी पालटले आणि त्याला लोकनाट्य असे रुप दिले. तमाशामधील गणगौळण, गणेश वंदना आणि इतरही पारंपरिक प्रकाराला फाटा दिला. तसेच महापुरुषांच्या नावाने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत. त्यातीलच त्यांनी 'जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव' हा पोवाडा गायला. देशभक्त घोटाळे नावाच्या लोकनाट्यात त्यांनी 1946 साली हा पोवाडा लिहिला होता.

VIDEO : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंचे मोठे योगदान

  • 'अण्णांनी दलित उपेक्षितांचे जीणं जगाच्या पटलावर नेलं'

अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील फार मोठी पोकळी भरुन काढली, क्रांतिकारक विचार दिला. अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यातून आजपर्यंत जो समाज साहित्याच्या परिघावर नव्हता, अशा समाजाला नायकत्व दिले. त्यांनी जो मजूर, कामगार, कष्टकरी, भटका समाज पाहिला अशा सामान्य रस्त्यावर राहाणारा, झोपडीत राहाणाऱ्या, शोषित, पिळला गेलेल्या सामान्य माणसाला नायक केले. त्यांना सन्मान दिला. त्यांचे दुःख, वेदना अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या.

मराठी साहित्य हे उच्चभ्रू समाजाचे, ब्राम्हणी, भांडवली वर्गाचे साहित्य अशी एक परंपरा राहिली होती. या परंपरेला अण्णाभाऊंनी छेद दिला. त्यांनी समाजातील सर्वात खालच्या वर्गाला नायकत्व देऊन हे साहित्य खऱ्या अर्थाने समृध्द केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 2 मार्च 1958 ला दलित साहित्य संमेलन झाले. त्याचे पहिले उद्घाटक अण्णाभाऊ साठे होते. त्यांचे उद्घाटकीय भाषण हे ऐतिहासिक ठरले. या उद्घाटकीय भाषणात अण्णाभाऊंनी सांगितले होते, की ही "पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, पृथ्वी ही दलितांच्या तळहातावर तरलेली आहे." हा फार मोठा संदेश अण्णाभाऊंनी दिला होता. त्यानंतर दलित साहित्याचा एक वेगळा प्रवाह समोर आला. यात बाबुराव बागुलांपासून, नामदेव ढसाळ, राजा ढाले, दया पवार, प्रल्हाद चेंदवणकर यासारखे साहित्यिक पुढे आले.

1972 मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. अण्णाभाऊंनी दलित हा शब्द जातीच्या अंगाने वापरला नाही. जाती आणि वर्ग या दोन्ही अर्थाने तो वापरला गेला. यानंतर जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यात दलित हा शब्दाचा अर्थ शोषित, कष्टकरी या अर्थाने वापरला गेला. यानंतर दलित साहित्याच्या झंझावाताने महाराष्ट्रच नव्हे तर जागतिक सांस्कृतिक घुसळण केली.

जगाला दलित साहित्याची दखल घ्यावी लागली. जो माणूस शाळेत गेला नाही त्याच्या साहित्यावर आज देशातील जेएनयूपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद पर्यंतच्या विद्यापीठांमध्ये त्यांच्यावर प्रबंध लिहिले जात आहेत. अभ्यासक त्यांच्या साहित्यावर पी.एचडी करत आहे. बाबुराव बागूल म्हणत की अण्णाभाऊ हे भारताचे मॅक्झिम गॉर्की आहेत.

VIDEO : 'अण्णांनी दलित उपेक्षितांचे जीणं जगाच्या पटलावर नेलं'

  • अण्णाभाऊ साठेंचे शेवटचे दिवस, दंतकथा आणि वास्तव -

कोणताही महापुरुष झाला की त्यामागे एक दंतकथा, भाकडकथा पसरवल्या जातात. अण्णाभाऊंबद्दल सांगायचे झाले तर, कम्युनिस्टांनी अण्णाभाऊंची उपेक्षा केली. त्यांना योग्य तो सन्मान दिला नाही. त्यांचा शेवटचा कालखंड हा अतिशय दारिद्र्यावस्थेत गेला. शेवटच्या कालावधीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ते चार दिवस उपाशी होते. असे अनेक तथाकथित लोक सांगतात.

अण्णा भाऊ घाटकोपर येथील घर सोडून गोरेगावला राहायला आले. माझ्या आजोबांचा तसेच आमच्या तिन पिढ्यांचा आण्णांशी संबध राहिला आहे. त्यांचं येणं-जाणं घरी असायचं. अण्णाभाऊ घाटकोपरच्या किंवा गोरेगावच्या एका झोपडपट्टीत राहत होते, हे खोटे आहे. अण्णाभाऊंना त्या काळात शासनाने कलावंत कोट्यातून एक घर दिले होते. फक्त इतकेच नाही सन 1968-69 साली कलावंत मानधन म्हणून महिन्याला त्या काळी 300 रुपये मानधन दिले होते. यामुळे ते उपाशी राहिले, हे खोटे आहे.

अण्णाभाऊ त्यांच्या निधनाच्या आधी एक दिवस आधी 17 जुलैला सचिवालयात (आताचे मंत्रालय) गेले. त्यावेळी बाबुराव भारस्कर नावाचे एक मंत्री होते. अण्णा त्यांना भेटले. यावेळी त्यांना मानधनही मिळाले होते. यानंतर ते एका चित्रपटाच्या समारंभाला गेले होते. तेथून टॅक्सीत ते गोरेगावला आपल्या घरी परतले. माझे घर आणि त्यांचे घर जवळच होते. टॅक्सीवाल्याला घर सापडत नव्हते. आम्ही घरासमोरच बसलो होते. तेव्हा टॅक्सिवाल्याने गाडी थांबवून विचारणा केली की, आप इनको पहचानते हो क्या? तेव्हा टक्सीत मागच्या बाजूला अण्णांना पाहिले तर त्यांची शुद्ध त्यावेळी हरपली होती. मी त्यांना ओळखले. मग नंतर मी त्या टॅक्सित बसलो आणि त्यांच्या घरी सोडले, असेही कॉम्रेड मोरे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले. ही गोष्ट 17 जुलैची होती. याचा अर्थ असा की, अण्णाभाऊंचे निधन चिरागनगरला, घाटकोपरला झाले नाही. त्यांचे घर आजही गोरेगावला आहे. ते चांगले घर आहे. अण्णा झोपडपट्टीत राहायला नव्हते.

डॉ. बाबुराव गुरव नावाचे 'अभ्यासक' आहेत. त्यांनी अण्णाभाऊंवर संशोधनही केले आहे. 'अण्णाभाऊ खूप आजारी असताना बलराज साहनी आले. त्यांनी अण्णांना आपल्या गाडीत बसवले आणि अण्णांना आपल्या गावी वाटेगावला नेऊन सोडले. यानंतर अण्णाभाऊ यांचे निधन झाले', असे गुरव यांनी आपल्या एका पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाच्या 14 आवृत्त्या निघाल्या आहेत. मात्र, ही गोष्ट खोटी आहे. अण्णाभाऊ आपल्या शेवटच्या काळात वाटेगावला गेले नव्हते. तसेच बलराज साहनी ही कधीच गेले नाही. मात्र, काही लोक खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम करत आहेत, असेही मोरे म्हणाले.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोकांनी अण्णाभाऊंबद्दल असा प्रचार केला की, अण्णाभाऊंनी त्या काळी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी 16 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला. त्यांनी घोषणा दिली, 'ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है'. मात्र, असे काहीही झालेले नाही.

आजही मुंबईत शकुंतलबाई आणि शांताबाई या अण्णाभाऊंच्या दोन मुली आहेत. त्यांनी मला आठवण सांगितली की, 15 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मुंबईची रोशणाई पाहायला गेले होते. तसेच अमर शेख यांच्याबद्दलही सांगितले जाते की तेही आण्णांसोबत मोर्चात होते. तर त्यांच्याही जी डायरी (रोजनिशी) प्रसिद्ध झाली आहे. त्यात अमर शेख यांनी लिहिले आहे की, ते 15 ऑगस्टला गिरगाव चौपाटीवर नंतर शिवाजी पार्कवर आणि कामगार मैदानावर त्यांनी गाणी गायली आणि या प्रकारे ते स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर जी माणसे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होतात ती माणसे 16 तारखेला मोर्चा कशाला काढतील? मात्र, तरीदेखील काही लोक खोटी माहिती पसरवत आहेत. हा खोटा प्रचार लोकांनी आण्णांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तरी थांबवावे आणि जे वास्तव आहे, सत्यपरिस्थिती आहे ती लोकांसमोर आणावी, अशी विनंती साहित्यिक सुबोध मोरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

VIDEO : अण्णाभाऊ साठेंचे शेवटचे दिवस, दंतकथा आणि वास्तव -

  • अण्णाभाऊंना बाबासाहेबांविषयी नितांत आदर; मात्र, त्यांनी कम्यूनिस्ट पक्ष कधीही सोडला नाही -

शेवटचा मुद्द्यावर बोलताना कॉम्रेड मोरे म्हणाले की, अण्णाभाऊंविषयी असेही बोलले जाते की, ते पूर्वार्धामध्ये कम्युनिस्ट होते. यानंतर उत्तरार्धामध्ये ते आंबेडकरवादी झाले. अशा तऱ्हेने मांडली केली जाते. तसेच कम्युनिस्ट पक्षाने अण्णाभाऊंची दखल घेतली नाही. त्यांची उपेक्षा केली. डॉ. यशोवंत म्हणून एक साहित्यिक आहेत. त्यांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, 'जग बदल घालूनी घाव' हे गाणे अण्णाभाऊंनी लिहिल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाने त्यांना जाब विचारला. आंबेडकर जयंती का साजरी करावी, असा एक वाद होता. मात्र, असे काहीही झालेले नाही.

मुळात अण्णांच्या 'जग बदल घालूनी घाव' या गाण्याविषयी एक संभ्रम आहे. अनेकांना वाटतं की, हे गाणं बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लिहिलं गेलं. मात्र, तसे काहीही झालेलं नाही. हे गाणं 1946 मध्ये 'देशभक्त घोटाळे' यात लिहिलं. यानंतर हे गाणं कम्युनिस्ट पक्षाचे लोक अनेकदा गात होते. यामुळे या गाण्यावरुन कोणताही वाद झालेला नव्हता किंवा अण्णा त्यामुळे नाराजही नव्हते. अण्णाभाऊंच्या काही कथा आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे धर्मांतर केले आहे त्या धर्मांतराच्या नंतर जे परिणाम झाले, येथील अस्पृश्य समाजात जे परिणाम झाले, जो एक नवा अस्मितेचा विचार आला, त्याने सर्व जुन्या रुढीपरंपरा सोडून दिल्या, याबद्दलची अण्णांची कथा लिहिली. तसेच बुद्धाची शपथ, उपकाराची फेड किंवा सापळा आहे, अशा आण्णांच्या कथांमध्ये काही चित्रण आले आहे. मात्र, या सर्व कथा अण्णा कम्युनिस्ट पक्षामध्ये असतानाच पक्षाचे साप्ताहिक युगांतरमध्ये प्रकाशित झाल्या. त्यामुळे असा कोणताही वाद झाला नाही. मात्र, विनाकारण अण्णांना बदनाम करण्याचे काम काही लोक करत आहेत. ते चुकीचे आहे.

मुळात अण्णाभाऊ साठे ज्या माटुंगा लेबर कॅम्पमधून त्या काळात जे कॉम्रेड्स त्यांना भेटले ते स्वत: आंबेडकरांच्या सोबत होते. त्यावेळेस अरविंद मोरे नावाचे एक नेते होते. मोरे हे महाराष्ट्राचे प्रमुख संघटकही होते. कॉ. के. एम साळवी हे काळाराम मंदिर सत्याग्रहातील प्रमुख नेते, कार्यकर्ते होते. तर शंकरनारायण पगारी हे आंबेडकरी जलसामधील प्रमुख कलाकार होते. यामुळे अण्णांना जातीविरुद्ध शोषणाचा वैचारिक वारसा आधीच मिळाला होता आणि तोच वारसा घेऊन आण्णा पुढे आले. यामुळे अण्णांची भूमिका नंतरच्या काळात बददली, ही माहिती खोटी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व त्या काळात होते. यामुळे बाबांसाहेबांचा प्रभाव असणं किंवा त्यांच्याविषयी आदर असणं यात काहीही गैर नाही. दलितांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आदर असणारच आहे. याप्रमाणेच अण्णांनी हा आदर आपल्या गाण्यांतून व्यक्त केला आहे. मात्र, यामुळे अण्णा भाऊ साठेंनी कम्युनिस्ट पक्ष सोडला असा जो अपप्रचार केला जातो, यात काहीही तथ्य नाही, असेही मोरे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत साधलेल्या संवादात स्पष्ट केले.

VIDEO : अण्णाभाऊंना बाबासाहेबांविषयी नितांत आदर; मात्र, त्यांनी कम्यूनिस्ट पक्ष कधीही सोडला नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.