ठाणे - कल्याण पूर्व भागात एका विना नंबर प्लेटच्या रिक्षाने दुचाकीस्वराला धडक देऊन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या रिक्षाच्या समोरच्या काचेवर "आता कसं वाटतय " असे लिहून कल्याण उपविभागीय RTO ला जणू चॅलेंज दिल्याचे दिसून आले आहे. याच रिक्षाने दुचाकीस्वराला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत अनधिकृत रिक्षासह विना परवाना रिक्षाचालक राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
विना नंबर प्लेटच्या रिक्षाची दुचाकीला धडक -
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली नेहमीच रहदारीने गजबजलेला असतो, त्यातच या नाक्यावर चोही बाजूला रिक्षा स्टँड असून त्यामुळेही वाहतूक कोंडी या नाक्यावर होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. त्यातच एका रिक्षाचालकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास एका दुचाकीस्वराला जोरदार धडक दिली. त्यामुळे काही क्षणात रस्त्यावरील काही नागरिक त्या रिक्षाचालका पकडण्यासाठी धावले असता, घटनस्थळावरच रिक्षा सोडून त्या चालकाने पळ काढला. हा रिक्षाचालक मद्यपान करून रिक्षा चालवत असल्याचे सांगण्यात आले.
चालकावर कोणाचे बंधन नाही काय?
अनधिकृत विना नंबर प्लेटच्या रिक्षा शहरात रस्त्यावर धावताना दिसून येतात. विशेष म्हणजे ज्या रिक्षाचालकाने दुचाकीस्वराला धडक दिली. त्या रिक्षाच्या कोणत्याच बाजूला नंबर प्लेट दिसत नव्हती. त्यामुळे अश्या राजरोसपणाने रस्त्यावर रिक्षा चालविणाऱ्या चालकावर कोणाचे बंधन राहिले नाही काय? असा नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे एका रिक्षा चालकाने रिक्षाच्या समोरच्या काचेवर "आता कसं वाटतय " असं लिहून RTO ला आणि वाहतूक पोलिसांना चॅलेंज दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.