ठाणे : नातेवाईकांच्या दोन मुलांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या आठ महिन्यांच्या गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या पोटात रक्तत्राव होऊन आठ महिन्याच्याअर्भकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील फातमानगर भागात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोटात लाथ मारणाऱ्या अल्पवयीन १६ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अल्पवयीन आरोपीला मारहाण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मेहजबीन चाँद अन्सारी (वय २३ ह्या भिवंडी शहरातील फातमानगर भागात कुटूंबासह राहात असून त्या आठ महिन्याच्या गरोदर होत्या. तर आरोपी हा १६ वर्षीय अल्पवयीन असून तोही याच परिसरात राहतो. त्यातच २५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास मेहजबीन यांच्या नणंदेचा मुलगा फरीद कुरेशी (वय १०) हा अल्पवयीन आरोपी सोबत घराबाहेर खेळत होता. त्यावेळी दोघेही खेळत असताना दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद होऊन फरीदने अल्पवयीन आरोपीला मारहाण करून तो तक्रारदार मेहजबीन यांच्या घरात पळून आला.
पोटात लाथ मारली : मेहजबीन यांना सांगितले कि, कैफ हा मला मारण्यासाठी येत आहे. असे सांगून फरीद हा मेहजबीन यांच्या पाठमागे लपला. एवढातच अल्पवयीन आरोपी घरात येऊन त्याने फरीदला मारहाण करण्यासाठी सुरुवात केली. हे पाहून दोघांचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत असतानाच अल्पवयीन आरोपीने त्यांच्या पोटात लाथ मारली. यामुळे त्यांना वेदना होऊन पोटात दुखापत झाली. शिवाय पोटात रक्तत्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
आठ महिन्याच्या शिशुचा मृत्यू : उपचारावेळी मेहजबीन यांच्या गर्भातील आठ महिन्याच्या शिशुचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्या मृत शिशुला गर्भातून बाहेर काढले. तर दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी २६ एप्रिल रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात मेहजबीन यांच्या तक्रारीवरून अल्पवयीन १६ वर्षीय आरोपीवर भादंवि कलम ३१६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गव्हाणे करीत आहेत.