ठाणे - सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. यामुळे झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांना बसला आहे. अशा शेकडो मजुरांना राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी खात्याच्या कल्याण विभागातर्फे मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या भितीपोटी अनेक परप्रांतीय मजूर पायपीट करत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मजुरांच्या खाण्या पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब लक्षात येताच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्रीभैरव सेवा समिती आणि भिवंडी जैन सोशल युवा ग्रुपच्या सहकार्याने जेवणाची पाकीटे, दूध पावडर, ओआरएस, टोप्या, पाण्याच्या बाटल्या, मास्क आदी जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल चव्हाण, अधीक्षक नितीन घुले, उपाधीक्षक हांडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यासाठी राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाचे निरीक्षक नंदकिशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक सुजित कपाटे, विक्रांत जाधव, एस. डी पवार, एच. डी. खरबस, साळवे आदींनी विशेष मेहनत घेतली.