नवी मुंबई - विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला पार पडला. या वेळी बोलताना नवी मुंबईतील हुकूमशाही बाजुला करायची असेल तर समन्वयाची भूमिका घ्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या मेळाव्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समिती सभापती तथा शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौघुले, माथाडी नेते शशिकांत शिंदे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
यावेळीं नवी मुंबई सद्यस्थितीत असलेल्या सत्ताधारी पक्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीकेची झोड उठवली. ही महाआघाडी शाहू फुलेंच्या विचारांची आहे. त्यामुळे नवी मुंबईत नाईक कुटुंबाच्या एकाधिकार शाहीला घाबरुन जाण्याची गरज नाही. असे यावेळी अजित पवार यांनी म्हंटले. नवी मुंबईतील हुकमशाही बाजूला करायची असेल तर रुसू नका सर्वांनी समन्वयाची भूमिका घ्या असे आवाहन अजित पवार यांनी महा आघाडीच्या पदाधिकारी वर्गाला केले.
महाविकास आघाडीचे सरकार अनेक वर्षे राहील मात्र काही बातम्यात ध चा मा केला जातो, त्यामुळे तुम्ही नको त्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका सध्या जाती जातीत भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. या पुढेही असे गैरसमज पसरवले जातील त्यामुळे कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. तुम्ही हलक्या कानाचे राहू नका. असेही पवार म्हणाले.
राज्यात एकही व्यक्ती उपाशी झोपता कामा नये म्हणून शिवाभोजन थाळी सुरू झाली आहे. मात्र, ज्याची ऐपत आहे तो ही 10 रुपयात जेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे गरजू व्यक्तींना जेवू द्या. असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाआघाडीमुळे बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. त्यामुळे कोणी नाराज होऊ नये असे त्यांनी इच्छुक उमेदवारांना सांगितले नवी मुंबईतील सिडकोच्या व एम एम आर डी संदर्भात सर्व प्रश्नावर मार्ग काढण्याची धमक महाआघाडीत आहे. ते सत्तेवर असताना त्यांनी प्रश्न सोडवले नाहीत ते आत्ता काय सोडवणार? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. इथे उपस्थित काही पदाधिकारी महापौर होतील, स्थायी समिती सभापती होतील नगरसेवक होतील. मात्र, नाईक काहीही होणार नाहीत असाही टोला त्यांनी लगावला.
केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प हा अंत्यत निराशाजनक व महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे असे सद्यस्थितीत सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही त्यांनी ताशेरे ओढले. मुख्य प्रश्नांला बगल देण्यासाठी वेगळच काही तरी केंद्रातील सरकार करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असेपर्यंत कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. नवी मुंबईची निवडणूक येत आहे. त्यामुळे कोणाच्या एकधिरशाहीला घाबरून जाण्याची गरज नाही महाआघाडी एकत्र असताना सोम्या गोम्याने गडबड करू नये असेही त्यांनी मिश्कीलपणे म्हंटले. नवी मुंबईतील लीज वरील जागा फ्री होल्ड कशी करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल असेही पवार यांनी बोलताना सांगितले. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण आघाडी सरकारने पुढाकार बांधले असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी तिन्ही पक्षाचे पॅनल बसवू तिथेही वेगवेगळ्या कार्यकर्त्याना जागा देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.