ठाणे: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्याच सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केले होते. 'ठाण्याचा पठ्ठ्या' असा उल्लेख करत अजित पवारांनी आव्हाडांवर टीका केली होती. मात्र ठाण्यात आल्यानंतर अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी बोलण्याचे टाळले. त्यामुळे आव्हाडांना अंगावर घेणारे अजित पवार गटातील ठाण्याचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अजित पवारांच्या मनात आहे तरी काय प्रश्न उपस्थित होत आहे.
धन्यवाद दादा: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्या सभेतच जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. ठाण्याच्या पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अधोगती झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. कार्यालयाच्या उद्धघाटनावेळी अजित पवार परत एकदा जिंतेंद्र आव्हाड यांच्यावर शरसंधान करतील असे कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु अजित पवार आव्हाडांवर एकही शब्द बोलले नाहीत. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ''धन्यवाद दादा" अशी पोस्ट केली. यावरुन राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेले हे नाट्य खरे आहे का खोटे आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.
संघटनेची वाटोळे झाले: अजित पवारांनी पहिल्या सभेत जितेंद्र आव्हाडांना 'व्हिलन' ठरवले होते. शरद पवारांनी अशा काही लोकांना सोबत घेतले आहे, ज्यांच्यामुळे संघटनेचे वाटोळे झाले. त्यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेता त्यांना 'ठाण्याचा पठ्ठ्या', असे म्हटले होते. आव्हाडांमुळे अनेक नेते राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
वाहतूक कोंडी: कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसांनी माजिवडा भागातील फ्लॉवर व्हॅली परिसरातील रस्ता बंद केला होता. काही पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या कडेला उभी वाहने उभी केली होती. तसेच रात्री ट्रक, मोठे टेम्पो कॅडबरी चौकातून वळण घेऊन घोडबंदरच्या दिशेने जात असल्याने बुधवारी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता. वाहने उभी करण्यास जागा नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाहने मुख्य महामार्गाच्या रस्त्याकडेला उभ्या केल्या होत्या. त्यामुळे महामार्ग अरुंद झाला. तसेच माजीवडा येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजीवडा चौकात बंदी केली आहे. ही वाहने कॅडबरी जंक्शन येथून वळण घेऊन उड्डाणपूल मार्गे वाहतूक करतात.
वाहतूक कोंडी - रात्री ट्रक, मोठे टेम्पो ही वाहने कॅडबरी जंक्शन येथे आली होती. तसेच हलक्या वाहनांचीही या मार्गावरून वाहतूक सुरू होती. या सर्व कारणांमुळे नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कॅडबरी जंक्शन ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरही वाहनांचा भार वाढल्याने मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या मार्गिकेवर माजिवडा ते तीन हात नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा-