ठाणे - 'कितीही संकट आले कोरोनाचे, करू बळकट हात बळीराजाचे' असे फलक भिवंडी तालुका कृषी सहायक यांनी दाखवत शेतकऱ्यांना दिलासा देणारा सामाजिक संदेश देऊन जनजागृतीची मोहीम राबवली आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळत असताना शेतकरी राजा तरला पाहिजे, यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून कृषी विभागातील कृषी सहायक, कृषी अधिकारी वर्ग जोमाने कामाला लागले आहेत.
कोरोना विषाणूमुळे टाळेबंदीची देशात परिस्थिती असून ही टाळेबंदी आता १७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे सर्व व्यापार, दळणवळण, कारखाने ठप्प असून या सर्वांमध्ये थांबलेला नाही तो केवळ शेतकरी...! विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कृषी सहायक हे कम्युनिटी किचन, आपत्कालीन समिती सदस्य या नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील कृषी सहायक यांनी कोरोनाबद्दल 'कितीही संकट आले कोरोनाचे, करू बळकट हात बळीराजाचे' असे फलक कृषी सहायक यांनी दाखवत शेतकऱ्याला दिलासा देणारा सामाजिक संदेश देत आहेत. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला, फळे ग्राहकापर्यंत पोहचविणे, विक्री व्यवस्थासाठी सहकार्य करणे अशी महत्त्वाची कामे करत आहेत.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाकडून फळबाग लागवड केली जाते. या योजनेच्या माध्यमातून टाळेबंदीच्या काळात सोशल डिस्टन्स राखून काम निर्मिती करून ठाणे जिल्ह्यातील सुमारे ६०० ते ६५० मजुरांना मजुरी उपलब्ध करून दिली जात आहे. खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. अशा वेळी कृषी सहायक नवीन फळबाग लागवड प्रस्ताव घेणे, यांत्रिकीकरण अर्ज घेणे, मागेल त्याला शेत तळे योजनेचे अर्ज, एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत शेडनेट पॉलीहाऊस, ठिबक सिंचन अर्ज, मृदा आरोग्य पत्रिका योजनेंतर्गत निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांचे माती नमुने काढणे इत्यादी कामे सुरू केली आहेत.
भात हे कोकणातील प्रमुख पीक आहे. टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी न करता गावात शेतकऱ्यांच्या शेतावर बियाणे मिळावे. त्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क करून बियाणे खतांची मागणी घेणे त्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. खरीप हंगामात प्रत्येक कृषी सहायक यांच्याकडे ५ भात प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून प्रत्येक कृषी सहायक यांच्याकडे एक शेतीशाळाचे नियोजन करण्यात येत आहे. शेतीशाळेच्या माध्यमातून एकाच गावातील २५ शेतकऱ्यांची निवड करून दर १५ दिवसांनी या निवडलेल्या शेतकऱ्यांचा वर्ग घेऊन त्यांना भात पिकावरील कीड रोग नियंत्रण, तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करून त्यांना तज्ञ केले जाते. शेतकऱ्यांना बांधावर तूर लागवडही चालू वर्षी मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.