ठाणे -मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात संजय ताकतोडे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाज कल्याण यांच्या वतीने कल्याण तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकात रास्ता रोको करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
अनेक वर्षापासून मातंग समाज अ, ब, क, ड अशा चार वर्गीकरणाची मागणी करत आहे. वर्गीकरण न झाल्यामुळे आरक्षण असूनही इतर समाजाला याचा फायदा होत असल्याचा मातंग समाजाचा आरोप आहे. अनेकवेळा अर्ज विनंत्या तसेच आंदोलने करूनही सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या संदर्भात शुक्रवारी निघालेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शुक्रवारी जागतिक महिला दिन असल्याने मोर्चेकरी महिलांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. यावेळी मातंग समाजाचे राजू धुरदेव, अरुण सकट, संजय घुले आदी पदाधिकाऱ्यांसह महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.