ठाणे - टपाल वेळेत न मिळणे, स्पीड पोस्ट, डाक वस्तू, पार्सल, बचतबँक, मनी ऑर्डर असो किंवा काऊंटरची सेवा याविषयी असलेल्या तक्रारींचे निवारण दीड महिन्यात न झाल्यास ती तक्रार डाक अदालतीमध्ये मांडण्यात येते. पोस्टाच्या वेगवेगळ्या सेवांबाबत अनेक तक्रारी असल्या तरी डाक अदालतीत ठाणे विभागातून गेल्या दोन वर्षांत केवळ एकच तक्रार दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
ठाण्यातील अनेक पोस्ट कार्यालयांत ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑनलाईन तक्रार, स्पीड पोस्ट, बिल भरणा, ऑनलाईन बिल पेमेंट असो किंवा कर्जाचा हप्ता, एटीएम, पार्सल, ट्रॅकर या नव्या हायटेक प्रणालीचा भाग बनत आहेत. हजारो लोकांचा दररोज पोस्ट कार्यालयाशी संपर्क येतो. पोस्टाशी संबंधित अनेक तक्रारी ग्राहक करत असतात. मग त्यामध्ये विशेषत: स्पीड पोस्ट, टपाल वेळेत न मिळणे, पार्सलची सेवा, मनिऑर्डर असो किंवा इतर सेवांबाबत उद्भवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. मात्र, या तक्रारींचे निवारण ६ आठवड्यांत न झाल्यास ही तक्रार डाक अदालतीत मांडण्यात येते.
ठाण्यात २०१७ -१८ मध्ये डाक अदालतीमध्ये एनसीसी प्रमाणपत्रासंदर्भात एक तक्रार दाखल होती. ती तक्रार निकाली काढण्यात आली असून २०१८-१९ मध्ये एकही तक्रार डाक अदालतीपर्यंत गेलेली नाही. ठाणे विभागात ठाणे, वज्रेश्वरी, गणेशपुरी, भाईंदर, मिरारोड या परिसरातील पोस्ट कार्यालयांचा समावेश होतो.