नवी मुंबई - सद्यस्थितीत जग खूप गतिमान झाले असल्याने पूर्वी मिळणारी मोसमी फळे हल्ली बाजारात १२ महिने मिळू लागली आहेत. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतही 'मलावी मँगो' नंतर 'टॉमी अँटकिंन' नावाचा आफ्रिकन आंबा दाखल झाला असून आंबाप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरत आहे.
हेही वाचा - ४ सामन्यात फक्त ३४ धावा!..वाचा बाराबती स्टेडियमवर कॅप्टन कोहलीचा इतिहास
भारतात साधारणतः उन्हाळ्यात मिळणारा आंबा हिवाळ्यातही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. नोव्हेंबर पासून ते १५ डिसेंबर पर्यंत आफ्रिकन 'मलावी मँगो' हा हापूसच्या जातीचा आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होता. मलावी मँगोमुळे नोव्हेंबर व डिसेंबर मध्येही हापूस प्रेमींना आंब्यांची चव चाखायला मिळाली होती. मलावीचा हंगाम संपल्यावर नवी बाजार समितीत टॉमी अँटकिंन हा आफ्रिकन जातीचा आंबा विक्रीसाठी आला आहे. मुळात टॉमी अँटकिंनचे आफ्रिकेत प्रचंड उत्पन्न घेतले जात आहे. हा आंबा महिनाभर बाजारात विक्रीसाठी राहणार आहे. चवीला फारसा गोड नसल्याने हा आंबा मधुमेही रुग्णालाही खाता येऊ शकतो. नवी मुंबईतील घाऊक फळ बाजारात हा आंबा ३०० रुपये प्रतिकिलोच्या दराने विकला जात असून हा आंबा जलवाहतूकीद्वारे भारतात आला असल्याची माहिती, घाऊक फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली
टॉमी अँटकिंन या आंब्यांची अमेरिकन व युरोपियन देशात मोठया प्रमाणावर विक्री होत आहे. पहिल्यांदा हा आंबा भारतात विक्रीसाठी आला आहे. सद्यस्थितीत टॉमी अँटकिंन आंब्यांचा एक कंटेनर भारतात दाखल झाल्याचे पानसरे यांनी सांगितले आहे.