ठाणे - गेल्या दीड महिन्यात ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीत कल्याण डोंबिवली महापालिका अव्वल ठरली होती. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांत रुग्णवाढीची तीन अंकी संख्येतील आकडेवारी आता दोन अंकी संख्येत आली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने रुग्णांच्या उपचारासाठी अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारले होते. मात्र, आता रुग्णसंख्या 100 ते 150 वर स्थिरावल्याने अनेक कोविड सेंटर्स तात्पुरती बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण केंद्रासह ठराविक कोविड रुग्णालय सुरू ठेवणार असल्याचे प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा - कोरोना: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २०० दिवसांहून अधिक; आयुक्तांनी मानले मुंबईकरांचे आभार
प्रशासनाने घेतला 'ही' कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय
कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या 100 ते 150 दरम्यान स्थिरावल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. यामुळेच कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने शहाड येथील विलगीकरण केंद्र, कल्याण पश्चिमेकडील आसरा फाउंडेशनमधील कोरोना केअर सेंटर तसेच, सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील टेनिस कोर्ट वरील एक्सटेंडेड कोरोना केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. तर, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय देखील 9 नोव्हेंबरपासून नॉन-कोविड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र, भविष्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यास रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी कल्याण-भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रा येथील विलगीकरण सेंटर तसेच, आयसीयू व्हेंटिलेटरच्या सुविधा असलेली रुग्णालये सुरू ठेवली जाणार असल्याचे साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा : नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन